औरंगाबाद - रांजणगाव भागात चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या 2 तरुणांना गुन्हे शाखेने काल अटक केली. शुभम अशोक झा (वय- 23, रा. आरतीनगर, रांजणगाव वाळूज) व त्याचा साथीदार सन्नी राजू कुलथे (वय- 19, रा. लाकडी वखार, बेगमपुरा) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 14 हजार 600 रुपयांचे चोरी केलेले 4 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जून महिन्यात वाळूज परिसरातून उत्तम पवार यांच्या घरात त्यांचे 4 मोबाईल चार्जिंगला लावले होते. अज्ञात व्यक्तीने चारही मोबाईल चोरून नेल्याची तक्रार पवार यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली होती. नंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, पवार यांच्या घरातून चोरलेले चारही मोबाईल झा हा विक्री करण्यासाठी रांजणगाव येथे येणार आहे. त्यावरून धोंडे यांनी पथकासोबत जाऊन रांजणगाव फाटा नजिक सापळा रचला व खबऱ्याने दिलेल्या माहिती प्रमाणे तरुण दिसताच त्याला ताब्यात घेत विचारपूस केली.
त्यानंतर झा याने साथीदारासोबत पवार यांच्या घरातील मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. झा याचा साथीदार कुलथे याचा शोध गुन्हे शाखेने घेतला असता, कुलथे बेगमपुरा भागातील वखारी येथे मिळून आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या कामगिरीमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाचाही समावेश होता.