जळगाव - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातून 171 प्रशिक्षणार्थी उमेदवारांची सेवा खंडित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या कठीण काळात या उमेदवारांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. मागील वर्षी झालेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून चालक व वाहक म्हणून या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती. आता मात्र, एसटी महामंडळाने अचानकपणे सेवा थांबवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोरोनामुळे 22 मार्चपासून टाळेबंदी सुरू करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा पूर्णपणे बंद आहे. परिणामी उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देखील एसटी महामंडळाकडे पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देखील विलंबाने होत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे एसटी महामंडळाचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. परिणामी महामंडळाने गेल्या वर्षी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जळगाव विभागात गेल्या वर्षी चालक व वाहक म्हणून भरती झालेल्या 171 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र, महामंडळाच्या आदेशानुसार या उमेदवारांच्या सेवेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी या विषयासंदर्भात नुकतेच आदेश पारित केले आहेत. सरळ सेवा भरती अंतर्गत चालक व वाहक या व्यतिरिक्त लिपिक-टंकलेखक, राज्य संवर्ग अधिकारी तसेच अनुकंप तत्त्वावर महामंडळाच्या सेवेत आलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, भविष्यात गरजेनुसार आवश्यकता भासल्यास त्यांना ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत सामावून घेण्याचेही आदेशात म्हटले आहे. मात्र, आताच्या कठीण काळातच नोकरी गेल्याने प्रशिक्षणार्थी उमेदवार हादरले आहेत.
कामगार संघटनाही आक्रमक
एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाला एसटीच्या विविध कामगार संघटनांनी आपला विरोध दर्शवला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी महामंडळाचा हा एक प्रकारचा तुघलकी निर्णय असून, तो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. या विषयाबाबत काही संघटनांकडून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.