नवी दिल्ली – पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे मोठे भूमीपुत्र होते. त्यांना खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक सुधारणांचे पितामह म्हणता येईल, असे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. ते तेलंगणा काँग्रेसच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा 1991 मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या आठवणींचे स्मरण हे जन्मशताब्दीच्या सोहळ्यात केले. ते म्हणाले, की पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे भविष्याबाबतची दृष्टी आणि त्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी धाडस होते. या अर्थसंकल्पाने आधुनिक भारताची पायाभरणी करण्यात आली. देशातील आर्थिक सुधारणांना या अर्थसंकल्पाने देशाला दिशा दाखवून दिली.
पहिला अर्थसंकल्प राजीव गांधींना समर्पित करण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने उदारीकरणाचे धोरण आणि नव्या आर्थिक सुधारणांची अनेक मार्ग खुली झाली होती. उदारीकरणाचा निर्णय हा अवघड पर्याय आणि धाडसी निर्णय होता. केवळ पंतप्रधान नरसिंह राव यांनी स्वातंत्र्य मला दिल्याने त्या गोष्टी घडून आल्या होत्या, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार असल्याची त्यांना पूर्ण कल्पना होती, असेही माजी पंतप्रधानांनी सांगितले.
पुढे मनमोहन सिंग म्हणाले, की त्यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांना मी नम्रपणाने अभिवादन करतो. राजीव गांधींप्रमाणे नरसिंह राव यांना गरिबांची चिंता होती.
1991 मध्ये घेण्यात आलेले कठोर निर्णय घेताना देशात दोन आठवड्यापुरतीच विदेशी गंगाजळी शिल्लक राहिली होती. पंतप्रधान नरसिंह राव हे नेहमीच चर्चेसाठी नेहमीच खुले असायचे. त्यांनी विरोधकांना विश्वासात घेतले होते. त्यामुळे त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी अधिकार आयोगामध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते.
पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे भाषेची असामान्य विद्वता होती. त्यांना भारतीय 10 आणि चार विदेशी भाषा अवगत होत्या, असे सिंग यांनी सांगितले. नवे तंत्रज्ञान असलेल्या कॉम्प्युटरचा वापर करायला नरसिंह राव शिकले होते. एवढेच नव्हे तर त्यांना प्रोग्रॅमिंगही चांगले माहित होते. नवीन शिकण्याची आवड असल्यामुळेच त्यांना हे शक्य झाल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.