नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेससोबत युती करण्यास नकार दिल्यानंतर उमेदवारांची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीतील ६ जागांवर 'आप'ने आपल्या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. नुकतेच 'आप'ने काँग्रेसबरोबर युती होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
'आप'ने दिल्लीच्या पूर्वमधून अतिशी, दक्षिणमधून राघव चढ्ढा, चांदनी चौक येथून पंकज गुप्ता, उत्तर-पूर्वमधून दिलीप पांडे, उत्तर-पश्चिममधून गुगन सिंह आणि नवी दिल्लीतून ब्रजेश गोयल यांना उमेदवारी दिली आहे. या ६ जणांना यापूर्वीच 'आप'ने त्यांना उमेदवारी दिलेल्या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. पश्चिम दिल्ली या ७ व्या आणि दिल्लीतील शेवटच्या लोकसभा मतदारसंघासाठी 'आप'ने उमेदवार घोषित केला नाही. याविषयी चर्चा सुरू असून यासंबंधी घोषणा करण्यात येईल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी सांगितले.
भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर विजय मिळवला होता. आम्ही दिल्ली विधानसभेच्या एकूण ७७ जागांपैकी ६६ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही विजय मिळवू, असेही राय यांनी सांगितले.
काँग्रेस-आप युती -
आप आणि काँग्रेसच्या युतीबाबत प्रश्न विचारला असता राय म्हणाले की, शिला दीक्षित यांनी या युतीला स्पष्टपणे नकार दिला होता. राहुल गांधींही युती होणे शक्य नसल्याचे म्हणाले होते. युती व्हावी अशी आपची इच्छा आहे. मात्र, काँग्रेसच यासाठी तयार नाही, असेही राय म्हणाले. गेल्या आठवड्यात एका सार्वजनिक सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत वक्तव्य केले होते. काँग्रेसने 'आप'सोबत युती करावी, असे म्हणून मी थकलो आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले होते.
केजरीवाल यांचा 'आप' पक्ष काँग्रेसविरोधी असलेल्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून जन्मला. भ्रष्टाचारविरोधी समिती असावी, अशी मागणी या चळवळीच्या माध्यमातून समोर आली. २०१३ साली काँग्रेसनेच दिल्ली विधानसभेत सत्तेत येण्यासाठी 'आप'ला मदत केली. मात्र, भ्रष्टाचारविरोधी लोकपाल विधेयकासाठी केजरीवाल यांनी ४९ दिवस आमरण उपोषण केले. २ वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत मोठ्या संख्येने 'आप'ने विजय मिळविला आणि काँग्रेसचा सुपडासाफ झाला.