नवी दिल्ली - बिजू जनता दलाचे (बीजेडी) माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर ओडिशामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पांडा यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला फायदा होणार असल्याचे पक्षातील लोकांचे मत आहे.
पांडा यांनी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. पांडा बिजू जनता दलातील उत्कृष्ट खासदार म्हणून परिचित होते. पांडा यांचा भाजपशी वाढत चाललेला संपर्क लक्षात घेऊन बिजू जनता दलाने गेल्यावर्षी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे कारण देत पांडा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर पांडा यांनी बीजेडीचा राजीनामा दिला.
२०१४ च्या निवडणुकीत बिजू जनता दलाने ओडिशातील एकूण २१ लोकसभेच्या जागांपैकी २० जागांवर विजय मिळविला होता. येथील केवळ सुंदरगढ हा केंद्रीय मंत्री ज्युअल ओराम यांचा मतदारसंघ ही एकच जागा भाजपने जिंकली होती.