पाटणा : बिहारमधील बेतिया येथे यूट्यूबर मनीष कश्यपच्या घराची जप्ती सुरू झाली आहे. पोलीस मनीष कश्यपच्या मझौलिया पोलीस स्टेशन हद्दीतील महना डुमरी येथील घरातील साहित्य जप्त करत आहेत. पोलिसांनी दरवाजा व खिडकीच्या चौकटी काढून घेतल्या : तत्पूर्वी, पोलिसांनी मंझौलिया येथील मनीषच्या घरी जाऊन दरवाजे व खिडकीच्या तीन चौकटी, दरवाजा, लाकडी खुर्ची, पंखा, तीन खोके व एक पलंग यासह अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. यावेळी आयजी, डीआयजी आणि बेतिया एसपी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन : मझौलिया प्रकरणात उच्च न्यायालयाने मनीष कश्यपचा जामीन फेटाळला आहे. मनीष कश्यपवर फक्त बेतिया येथे सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पाच प्रकरणांमध्ये आरोपपत्र आहे, एका प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. तर एका प्रकरणात पाटणा उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्याला पोलिसांना शरण जाण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.
काय आहे आरोप: तामिळनाडूतील बिहारमधील मजुरांना कथित मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याचा मनीष कश्यपवर आरोप आहे. या बनावट व्हिडिओ प्रकरणात 5 जणांना आरोपी बनवण्यात आले होते. यामध्ये तीन जणांना आधीच अटक करण्यात आली आहे. मनीष कश्यपसह आणखी एक आरोपी फरार आहे. मनीषवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र तामिळनाडू प्रकरणानंतर बिहारची पोलीसदेखील सक्रिय झाले आहेत.
बिहार पोलिसांनी यापूर्वीच दिला होता कारवाईचा इशारा: तामिळनाडूमधील व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर तामिळनाडू सरकारने तपासासाठी थेट 10 सदस्यांची टीम तयार केली. त्यामध्ये अफवा पसरविणारे व्हिडिओ आणि पोस्ट्सचा शोध घेण्यात आला. त्यासंदर्भात पोलिसांनी 13 गुन्हे दाखल करत कारवाईचा फास आवळला आहे. व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये उत्तर भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची दखल घेत बिहारचे एडीजी जितेंद्र सिंह गंगवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सर्व व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. लोकांमध्ये भीती पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला होता.