चामराजनगर (कर्नाटक) - चामराजनगर (Chamarajanagar in Karnataka) येथे लग्नाची मागणी धुडकावल्यामुळे संतप्त झालेल्या 23 वर्षीय तरुणाने स्वत:सह प्रेयसीला कारमध्ये बंद करून कारला आग लावली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दोघांचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मामबली गावाच्या बाहेर जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या कारमध्ये श्रीनिवास (23) आणि कंचना (22) यांचे मृतदेह मिळाले आहेत. अगारा-मामबली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, की कारच्या आतमध्ये पेट्रोल ओतून आग लावण्यात आली आहे. यामध्ये प्रेमीयुगुलाचा होरपळून मृत्यू झाला. दोघे एकाच वर्गात शिक्षण घेत होते.
कंचना सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती, तर श्रीनिवास टॅक्सी चालक होता. श्रीनिवासने कंचनासमोर अनेकवेळा लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तिने प्रत्येक वेळा त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला होता.
श्रीनिवासने शुक्रवारी कंचनाला आपल्या कारमधून गावापर्यंत सोडण्याचा प्रस्ताव दिला. श्रीनिवास तिला घेऊन जात असताना गावाबाहेर त्याने कारमध्ये पेट्रोल शिंपडले व कारला आग लावली. श्रीनिवासने तीन महिन्यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.