नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) अध्यक्ष सीताराम येचुरी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (सीपीआय) अध्यक्ष डी. राजा यांची भेट घेतली. ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ नववर्षानिमित्त ही भेट घेण्यात आली, तसेच यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत अनौपचारिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
भेट अनौपचारिक, मात्र शेतकरी आंदोलनावर चर्चा..
येचुरी यांनी सांगितले, की शरद पवार यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. शेतकरी आंदोलनाबाबत सर्व घटनांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आता सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत निर्णय आल्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत.
तर, डी. राजा यांनी सांगितले, की ही केवळ अनौपचारिक भेट होती. शेतकरी आंदोलनाबाबतही आम्ही चर्चा केली. यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे अद्याप बाकी आहे. त्यानंतर शेतकरी संघटना काय निर्णय घेतात, यावर आम्ही लक्ष ठेऊन असल्याचे राजा यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले..
दरम्यान, आज(सोमवार) कृषी कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. केंद्र सरकार जर कृषी कायद्यांना स्थगिती देऊ शकत नसेल तर, आम्ही स्थगिती देऊ. त्यासाठी न्यायालय समिती नेमण्यास तयार आहे, असेही न्यायालयाने फटकारले आहे. नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत गेल्या दीड महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने आतापर्यंत आठवेळा शेतकरी संघटनांसोबत चर्चा केल्या मात्र, त्या अयशस्वी ठरल्या आहेत. या सर्व गोंधळात आज सुनावणी पार पडली.
हेही वाचा : 'केंद्र सरकार जर कृषी कायद्यांना स्थगिती देऊ शकत नसेल तर, आम्ही देतो'