नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असणारे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर जबाब नोंदवला. या प्रकरणाच्या तपासासाठी सहा पोलिस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये 4 महिला पोलिसांचा समावेश आहे. डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे.
शुक्रवारी कुस्तीपटूंचे जबाब नोंदविले : ब्रिजभूषण शरण सिंह यांनी एसआयटीसमोर निवेदन देताना आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, लवकरच ते त्यांची बाजू मांडणारे काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग सादर करतील. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात आहे. यामध्ये काही राजकीय पक्षांचे लोक देखील सामील आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारीच सर्व पीडित कुस्तीपटूंचे कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापूर्वी गुरुवारी पोक्सो प्रकरणात पीडित कुस्तीपटूंचा जबाब नोंदवण्यात आला होता.
कुस्तीपटू राजीनाम्याच्या मागणीवर ठाम : दुसरीकडे, ब्रिजभूषण सिंहच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतरवर कुस्तीपटू सातत्याने निदर्शने करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवून अटक होईपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कनॉट प्लेस पोलिस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवले होते. या प्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग झाला तेव्हा ती अल्पवयीन होती, अशी तक्रार पीडितेने केली आहे. त्याच वेळी, इतर सहा महिला कुस्तीपटूंच्या आरोपांच्या आधारे दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. दिल्ली पोलिस या आरोपांची चौकशी करत आहेत.
हेही वाचा :