नवी दिल्ली : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या प्रकरणाची चौकशी करत असलेले दिल्ली पोलीस गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. याबाबतची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे. आज दुपारपर्यंत पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतील, अशी अपेक्षा आहे. पोलिसांना बुधवारीच दोषारोपपत्र दाखल करायचे होते, मात्र कागदपत्रांमधील काही त्रुटींमुळे आरोपपत्र दाखल होऊ शकले नाही.
लैंगिक छळाचा आरोप : ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यात आली. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली पोलिसांना 15 जूनपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करून अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितले होते.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण : जानेवारी महिन्यात महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने एक अंतर्गत समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी केली. मार्चमध्ये अंतर्गत समितीचा अहवाल आल्यानंतर महिला कुस्तीपटूंनी समितीवर पक्षपाताचा आरोप केला होता. 28 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आयपीसीसह पॉक्सो अंतर्गत एफआयआर नोंदवला. त्याचवेळी तब्बल 35 दिवस ठिय्या आंदोलन केल्यानंतर 28 मे रोजी सर्व आंदोलकांना जंतरमंतरवरून हटवण्यात आले. यानंतर वैतागलेल्या कुस्तीपटूंनी पुन्हा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी क्रीडामंत्र्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा -