हैदराबाद - 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिवस ( World Earth Day ) म्हणून ओळखला जातो. हे साजरे करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना पृथ्वीचे महत्त्व समजावे आणि पर्यावरण अधिक चांगले राखण्यासाठी जागरूक व्हावे. यामुळेच या दिवशी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. वाढते तापमानवाढ, बदलते ऋतूचक्र आणि वातावरणातील अनियमितता यांमुळे सर्वांमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे. वसुंधरा दिनाचे औचित्य साधून गुगल खास डूडल तयार करून आजचा दिवस साजरा केला आहे.
काय खास आहे या गुगल डूडलमध्ये?
डूडल (Google Doodle) मध्ये चार स्थानांच्या अॅनिमेशनची मालिका दाखविण्यात आली आहे. हवामान बदलाचा पृथ्वीवर कसा परिणाम झाला आहे हे दाखवण्यासाठी हे अॅनिमेशन तयार करण्यात आले आहे. अॅनिमेशनमध्ये वेगवेगळ्या वर्षांची चित्रे आहेत. Google Earth Timelapse आणि इतर स्त्रोतांकडून टाइम-लैप्स इमेजरीचा वापर करून, डूडल आपल्या ग्रहाभोवती चार वेगवेगळ्या ठिकाणी हवामान बदलाचा प्रभाव दर्शवतोय. अॅनिमेशनमधील चार प्रतिमा टांझानियामधील माउंट किलिमांजारो, सेमेरसुकिन ग्रीनलँड, ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ आणि जर्मनीतील अॅलेंडमधील हार्ज फॉरेस्टच्या आहेत. हे अॅनिमेशन प्रत्येक तासानंतर बदलतील.
![World Earth Day](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15083787_googl.png)
वसुंधरा दिनी विविध उपक्रम - 1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. जैवविविधतेचे नुकसान, वाढते प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अर्थ डे ऑर्गनायझेशन (पूर्वीचे अर्थ डे नेटवर्क) तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात 193 देशांतील 1 अब्जाहून अधिक लोकांचा समावेश आहे.
2022 वर्षाची थीम - यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम 'इन्वेस्ट इन आवर अर्थ' अशी आहे. म्हणजे 'आपल्या पृथ्वीवर गुंतवणूक करा'. यातील कळीचा मुद्दा म्हणजे धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्य आणणे आणि समानतेने अंमलबजावणी करणे. याआधी 2021 साली जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती 'आमची पृथ्वी पुनर्संचयित करा' आणि 2020 ची थीम 'क्लायमेट अॅक्शन' होती.