नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर असून कोरोना रुग्णांनी रुग्णालये भरून गेली आहेत. अनेक रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. या संकटात दक्षिण दिल्लीतील गुरू विश्राम वृद्धाश्रम चर्चेत आहे. कारण, या वृद्धाश्रमात कुटुंबांनी नाकारलेल्या वृद्धांची मायेने काळजी घेतली जात असून त्यांना सर्व आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. या वृद्धाश्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. वृद्धाश्रमात वृद्धांसाठी सर्व आरोग्य सेवांची व्यवस्था केली आहे. आश्रमातच 40 आयसीयू आणि 10 ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. याशिवाय 24 तास देखरेखीसाठी डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारीही हजर असतात.
कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता वृद्धाश्रमात सर्व आरोग्य सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी आयसीयू बेडपासून ते ऑक्सिजन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले आहे. वृद्धाश्रमात आणलेले अनेक वृद्ध नागरिक मुख्यतः अत्यंत गंभीर अवस्थेत आढळतात. काही गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. म्हणूनच वृद्धाश्रमात एका छोट्या हॉस्पिटलची व्यवस्था केली गेली आहे, असे आश्रमाचे संस्थापक जी.पी. भगत यांनी सांगितले.
खासगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवांच्या धर्तीवर, वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रमात आरोग्य व्यवस्था केली आहे. वृद्धाश्रमात आणल्या गेलेल्या अनेक जणांना आपले नावही माहिती नसते. नव्याने त्यांचे नामकरणही आम्ही करतो, असे वृद्धाश्रमात रूग्णालयाचे वैद्यकीय प्रभारी इंद्रकुमार शर्मा यांनी सांगितले.
स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड -
वृद्धाश्रमात सर्व उपचारांची व्यवस्था केली गेली आहे. यासह, कोरोनाची लागण झाल्यास वृद्धांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड देखील बनविला आहे. मात्र, अद्याप वृद्धाश्रमात कोणालाही कोरोना संसर्ग झालेला नाही. जर कोणी आढळलेच तर त्यांच्या आरोग्य सेवेसाठी वृद्धाश्रमात आयसीयू व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे, असे डॉ. अनुराग कुमार सिंह यांनी सांगितले.
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 34 हजार 154 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 887 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या 2 कोटी 84 लाख 41 हजार 986 आहे. तर 17 लाख 13 हजार 413 सक्रिय रुग्ण आहेत आणि आतापर्यंत 3 लाख 37 हजार 989 मृत्यू झाले आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 11 हजार 499 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2 कोटी 63 लाख 90 हजार 584 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.