चित्रदुर्ग - सेंद्रीय शेती फुलवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका तरुणीने आयटी कंपनीतील चांगल्या जॉबला रामराम ठोकला. अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या रोजा रेड्डी या तरुणीने शेती आणि आयटी शिक्षणाचा मेळ घालत यशस्वीरित्या सेंद्रीय शेती सुरू केली आहे. आता रोजा रेड्डी दिवसाला १० हजार रुपये कमवत असून तिने तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना काळात गेली नोकरी -
रोजा रेड्डी ही कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील चालकेरे तालुक्यातील दोनेहळ्ळी गावातील रहिवासी आहे. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून बंगळुरातील एका नामांकीत आयटी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, कोरोनानंतर आलेल्या लॉकडाऊनचा तिच्या नोकरीवर परिणाम झाला. त्यामुळे तिने नोकरी सोडली. सेंद्रिय शेती करण्याचे स्वप्न ती आधीपासूनच पाहत होती. मात्र, कुटुंबीयांच्या दबावामुळे तिला अभियांत्रिकीचे शिक्षण घेवून नोकरी करावी लागली होती.
कुटुंबीयांचा विरोध झुगारून शेती करण्याचा निर्णय -
कोरोना संधीचा फायदा घेवून तिने शेती करण्याचा निर्णय कुटुंबीयांना सांगितला. यास कुटुंबीयांनी सुरुवातील विरोध केला. दुष्काळी गाव असल्याने तर शेतीचा विचार करू नको, असे कुटुंबीयांचे मत होते. मात्र, ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. वडीलोपोर्जित सहा एकर शेतीत नाविण्यपूर्ण प्रयत्न करत सेंद्रीय शेती फुलवण्याचा तिने निर्णय घेतला.
मोबाईल अॅपद्वारे मालाची विक्री -
रोजा हिने सेंद्रीय शेती करण्याची सर्व माहिती मिळवली. भाज्याचे बियाणे बेळगाव, महाराष्ट्रातून विकत आणले. सहा एकर शेतात तिने ३५ प्रकारच्या भाज्यांचे सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरूवात केली. शेतात पिकवलेला माल विकण्यासाठी योग्य बाजारपेठ महत्त्वाची असते. यासाठी तिच्या आयटी ज्ञानाची मदत झाली. शेतात पिकवलेला माल विकण्यासाठी तिने एक मोबाईल अॅप विकसित केले. या अॅपद्वारे ती बंगळुरू शहर आणि उडूपी जिल्ह्यात भाज्या विकते. यातून ती दिवसाला दहा हजार रुपये म्हणजेच महिन्याला तीन लाख रुपये कमावते. या अॅपद्वारे ती सेंद्रीय शेतीबाबत जनजागृती अभियानही चालवते.
चालकेरे हा दुष्काळग्रस्त तालुका असून पाण्याची कायमच वाणवा असते. त्यामुळे कमी पाण्यात शेती करण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. रोजाने सर्वप्रथम शेतात एक बोअरवेल घेतला. याद्वारे सहा एकराला ठिबक सिंचन केले. तसेच भाज्यांसाठी सेंद्रीय खतांचा वापर केला. भारतीय तसेच परदेशी भाज्याही ती सेंद्रीय पद्धतीने पिकवते.
सेंद्रीय शेतमालाची ऑनलाइन कंपनी उभारण्याचे स्वप्न -
रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता तिने सेंद्रीय शेतीवर लक्ष देण्याचे ठरवले आहे. यासाठी ऑनलाइन मार्केटिंग कंपनी सुरू करण्याचे रोजाचे स्वप्न आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे हतबल निराश न होता शिक्षणाच्या जोरावर शेतात नवनवीन प्रयोग यशस्वी करता येऊ शकतात. तसेच यातून चांगले उत्पन्नही मिळू शकते. हे रोजा रेड्डी या तरुणीने दाखवून दिले आहे. तरुणांपुढे तिचा आदर्श कायमच राहील.