हैदराबाद : अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी सध्या मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत राचकोंडा पोलिसांनी एका महिला तस्कराला अटक केली आहे. ही महिला आंध्रप्रदेशमधील गांजा हैदराबाद आणि महाराष्ट्रात पुरवण्याचे काम करत होती, अशी माहिती समोर आली आहे.
प्रमिला बाबू मोगरी (२९) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती महाराष्ट्राच्या मुंबईची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. २०१९मध्ये ती आपल्या भावासोबत विशाखापट्टणमला गेली असता, तिची ओळख एका गांजा तस्कराशी झाली. यानंतर कमी मेहनतीत पैसे कमवण्याचे आमिष दाखवून त्याने तिला गांजाची विक्री करण्याची ऑफर दिली. तिने त्यानंतर त्या व्यक्तीकडून गांजा विकत घेऊन, जास्त किंमतीला तो महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये विकण्यास सुरुवात केली.
यापूर्वी तिला, २२ नोव्हेंबर २०१९ला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी तिच्याकडून २० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर, २०२०च्या मार्चमध्ये तिची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तिने तस्करीस सुरुवात केली. यानंतर तिच्याबाबत माहिती मिळताच राचकोंडा पोलिसांनी सापळा रचत तिला अटक केली. तिच्याकडून १८ किलो गांजा आणि पाच हजार १०० रुपये रोख रक्कम, तसेच एक मोबाईल जप्त करण्यात आला. तिला सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा : दारूड्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला दिलं पेटवून