नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शनिवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबल्याने एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. रस्त्यात तुंबलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.
पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी आहुजा असे या महिलेचे नाव असून ती प्रीत विहार येथील रहिवासी आहे. कुटुंबासह ती सुट्टीसाठी चंदीगडला जात असताना तिला विजेचा धक्का बसला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ट्रेन पकडण्यासाठी साक्षी स्टेशनवर टॅक्सीतून खाली उतरली होती. तेथे मुसळधार पावसामुळे भरपूर पाणी साचले होते. त्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.
रेल्वेचा निष्काळजीपणा : यावर मृत महिलेच्या वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही चंदीगडला जात होतो. माझी मुलगी साक्षी आहुजा हिचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा मी पार्किंग एरियात होतो. संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप महिलेचे वडील लोकेश कुमार चोप्रा यांनी केला आहे. या दुर्घटनेत रेल्वेचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. महिला बेशुद्ध पडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.साक्षीला तिची बहीण माधवी चोप्राने लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये नेले असता जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप : पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूसाठी शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. नातेवाईकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.