बेंगळुरू : बेगळुरू शहरात अवैधरित्या विकत घेतलेली गर्भपाताची गोळी खाल्याने एका 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. (Woman dies after having abortion pill in Bengaluru). 11 महिन्यांच्या बाळाची आई, प्रीती कुशवाह असे मृत महिलेचे नाव असून ती एका नामांकित ई-कॉमर्स कंपनीत नोकरीला होती. तर तिचा नवरा एका खासगी कंपनीत कामाला आहे. (Woman dies after having abortion pill).
पती घरी नसताना खाल्या गोळ्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर रोजी वैद्यकीय तपासणीदरम्यान या जोडप्याला गर्भधारणा झाल्याची माहिती मिळाली. पहिले मूल अद्यापही लहान असल्याने महिलेने गर्भधारणा न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने पतीला गर्भपाताच्या गोळ्या आणण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. सोमवारी रात्री पती घरी नसताना प्रितीने गोळी खाल्ली. गोळी खाल्यानंतर तिला असह्य वेदना होवून तीव्र रक्तस्त्राव सुरु झाला. तिच्या पतीने तिला दवाखान्यात जाण्याचा आग्रह धरला मात्र तिने नकार दिला.
अनैसर्गिक मृत्यूची नोंद : मंगळवारी मात्र तिचे अचानक भान हरपल्याने तिच्या पती आणि भावाने तिला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणताही गैरप्रकार दिसून आला नाही. गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने प्रीतीचा मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसात केली आहे. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.