लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) - देशातील कोरोनाची स्थिती अतिशय बिकट असून मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण असताना येथील एका कुटुंबात 24 तासाच्या आत तीन भावांचा मृत्यू झाल्याने भागात खळबळ उडाली आहे. या तिघांनाही निमोनियाचा त्रास होता. त्यांना कोरोनावरील इलाज न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. 45, 50 आणि 53 असे वय असलेल्या तीन भावांचा 24 तासाच्या आत मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिघाही भावांना न्यूमोनिया झाला होता आणि त्यांची प्रकृती वेगाने ढासळत होती. दम लागत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांचा मृत्यू झाला. ज्येष्ठ बंधूचा घरी मृत्यू झाला तर इतर दोन जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबातील सदस्यांना घरी अलगीकरणात राहण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - कुंभमेळ्यातून आलेल्यांना १४ दिवस सक्तीचे गृह विलगीकरण; दिल्ली सरकारचा निर्णय
खासगी रुग्णालयात दोन भावांवर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले की, "जेव्हा त्यांना येथे आणले गेले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आम्ही त्यांना ताबडतोब ऑक्सिजन लावले आणि बरे करण्याचा प्रयत्न केला. गेल्या एका आठवड्यापासून ते आजारी होते आणि सुरुवातीला त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आजारी पडल्यावर आम्ही लोकांना योग्य उपचार आणि पुरेसा विश्रांती घेण्याचा सल्ला देतो.
लखीमपूर खेरीचे सीएमओ डॉ. मनोज अग्रवाल म्हणाले, "कोविडमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक चाचणीतून दिसून येत नाही. मात्र, आम्ही पुढील अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. गेल्या 24 तासात कोविडमुळे जिल्ह्यात अधिकृत दोन मृत्यू झाल्याची नोंद आहे.