डेहराडून - उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडींनी वातावरण तापलं आहे. तीरथसिंग रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून पाच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री बदलण्याची ही तीसरी वेळ आहे. राज्याला पुन्हा एकदा नवीन मुख्यमंत्री मिळणार आहेत. या संदर्भात भाजपा दुपारी तीन वाजता विधिमंडळ पक्षाची महत्वाची बैठक घेणार आहे. उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयीची घोषणा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत, मोदी लाटेत भाजपाने भरीव विजय मिळविला आणि 57 जागा घेऊन सत्ता स्थापन केली होती. परंतु डबल इंजिन सरकारमध्येही राज्याच्या नेतृत्त्वावरून पेचप्रसंगाचे वातावरण होते. पूर्ण बहुमत असूनही, त्रिवेंद्र रावत यांना कार्यकाळ होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांची खुर्ची गमवावी लागली. त्याचबरोबर तीरथसिंग रावत यांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता पुन्हा एकदा राज्यात नेतृत्वबदल होणार आहे.
तीरथसिंह रावत यांचा राजीनामा -
तीरथसिंह रावत यांनी 10 मार्च रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते लोकसभेचे खासदारही आहेत. अशा परिस्थितीत तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्यत्व घेण्याचा नियम होता. म्हणजेच त्यांना कोणत्याही विधानसभा जागेवरून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत राज्यातील रिक्त जागांवर नजर टाकली तर गंगोत्री, हल्द्वानी विधानसभा जागा सध्या रिक्त आहेत. परंतु कोरोना परिस्थितीत या जागांवर पोटनिवडणूक घेणे अवघड दिसत आहे. त्यामुळे नेतृत्व बदलणे हा भाजपा हाय कमांडकडे एकच पर्याय उरला होता. सर्व समीकरणे लक्षात घेता उत्तराखंड राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलण्याचा निर्णय उच्च कमांडने घेतला आहे.
घडामोंडाचा वेग -
मागील तीन दिवसांपासून तीरथ सिंह रावत दिल्लीमध्ये होते. शुक्रवारी त्यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री तीरथ सिंह रावत दिल्लीहून डेहराहूनला परतले. त्यानंतर ते थेट सचिवालयात गेले. सचिवालयातील कामकाज आटपवून पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली नाही. त्यानंतर राजभवनात पोहोचले आणि रात्री अकरा वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
पुढचा मुख्यमंत्री कोण?
तीरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्याने राज्याचा पुढचा प्रमुख कोण होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवाराच्या नावाचा निर्णय भाजपा विधिमंडळ मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक, मंत्री धन सिंह रावत, सतपाल महाराज, बिशन सिंह चुफाल यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. तसेच तीरथ यांच्या आधी मुख्यमंत्री असलेले त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याकडे सत्ता सोपविण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
डॉ. रमेश पोखरीयाल निशंक....
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याला नवा मुख्यमंत्री देण्यासाठी भाजपाला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, निवडणुकीत काँग्रेस भाजपाला कडे आव्हाने देऊ शकते. भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, पक्षाची उत्तराखंडमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात भाजपाला एक मोठा चेहरा देणे गरजेचे आहे. याला रमेश पोखरीयाल एक उत्तम पर्याय आहेत.
धनसिंग रावत
धनसिंग रावत हादेखील एक मोठा चेहरा असून संभाव्य मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक वेळी त्यांचे नाव पुढे येत असते. धनसिंग रावत हे संघाचे अत्यंत निकटचे मानले जातात. सध्याच्या संपूर्ण सरकारमध्ये जर कोणी संघाच्या जवळचे आहे तर ते धनसिंह रावत आहेत.
सतपाल महाराज
उत्तराखंडमध्ये सत्ता बदलल्यास निवडणुका न घेता आमदारांमधून नवीन मुख्यमंत्री बनवता येईल. अशा परिस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वाबद्दल बोललो. तर सतपाल महाराजांचे नाव सर्वात पुढे आहे. सतपाल महाराज अनेक वेळा आमदार आणि खासदारही राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतही त्यांचे संबंध चांगले आहेत. उत्तराखंडसह संपूर्ण देशात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. सतपाल महाराज काँग्रेसमधून भाजपामध्ये आले आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे आमदार त्यांच्या नावावर सहमत होणार नाहीत.
बिशनसिंग चुफाल...
बिशनसिंग चुफाल पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि मंत्री आहेत. पाचव्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्येही ते आमदार राहिले आहेत. त्यांचे पक्षात विशेष स्थान आहे. तसेच त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा अनुभवही आहे. जर एखाद्या विद्यमान आमदाराला निवडायचे असेल तर बिशनसिंग चुफाल हेदेखील नाव असू शकते.