नवी दिल्ली - भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. हा नवा विषाणू अधिक घातक असून याचा प्रसार झपाट्याने होत आहे. या व्हेरिएंटला 'इंडियन व्हेरिएंट' म्हणून संबोधण्यात येत आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही देशाचा नाही तर कोरोना व्हेरियंटचा वैज्ञानिक नावानेच उल्लेख करावा, अशी विनंती जागतिक आरोग्य संघटनेने केली.
भारतात आढळलेला B.1.617 हा कोरोना व्हेरियंट हा भारतीय व्हेरियंट असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या 32 पानाच्या अहवालात B.1.617 या कोरोना व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट म्हटलेलं नाही. भारतीय व्हेरियंटसंदर्भातील बातम्या तथ्यहीन आहेत, असे केंद्रीय मंत्रालयाने म्हटलं आहे.
तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ज्या देशात कोरोनाचे नवे प्रकार नोंदवले गेले आहेत. त्या देशाच्या नावावरून कोरोनाचा प्रकार ओळखला जात नाही. सर्वांना वैज्ञानिक नावांनी व्हेरिएंटचा उल्लेख करावा, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
B.1.617 व्हेरियंट चिंताजनक -
डब्ल्यूएचओने मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालात B.1.617 चिंताजनक म्हटलं आहे. आतापर्यंत 44 देशांमध्ये हा व्हेरियंट आढळला आहे. हा व्हेरियंट मूळ स्वरूपापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तसेच या व्हेरियंटमध्ये संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे.
B.1.617 व्हेरियंटवर डब्ल्यूएचओकडून अभ्यास -
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार कोरोच्या या नवीन प्रकारावर लसीचा कमी परिणाम होईल. डब्ल्यूएचओ सध्या याचा अधिक अभ्यास करीत आहे. सध्या जगभरात दिली जाणारी लस या प्रकारावर किती परिणाम करेल हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसर्गाचा प्रसार थांबविण्यावर आणि होणाऱ्या मृत्यूवर अंकुश ठेवण्यावर सध्या आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.
हेही वाचा - 'लस महोत्सव' साजरा केला, मात्र लसीची व्यवस्था नाही'; प्रियंका गांधींचा मोदींवर घणाघात