हैदराबाद - रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य ( Russia Ukrane War ) स्थिती आहे. अशात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास याचे गंभीर परिणाम अनेक देशांना भोगावे लागतील. त्यापैकी एक भारतही असेल, त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध हे भारतासाठीही मोठं ( Impact Of Russia Ukrane War On India ) संकट असणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे नेमके कारण ( Reason Behind Russia Ukraine Conflict ) काय आहे आणि याचे भारतावर काय परिणाम होतील, जाणून घेऊया.
नेमका काय आहे वाद? -
'नाटो'च्या मुद्यावरून रशिया युक्रेनमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. युक्रेनने 'नाटो'चे सदस्यत्त्व मिळण्याची मागणी केली आहे. यावर रशियाने आक्षेप घेतला आहे. युक्रेनला 'नाटो'चे सदसत्त्व मिळाल्यास आमच्या सुरक्षेला कायमचा धोका असेल, असं रशियाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे याप्रकरणात अमेरिकेनेही युक्रेनचं समर्थन केलं आहे. युक्रेन हा सार्वभौम देश असून त्यांच्या देशासाठी योग्य तो निर्णय घेण्याचे त्यांना स्वतंत्र आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.
युद्धाचा काय होणार भारतावर परिणाम? -
मात्र, अशा परिस्थितीत भारतापुढे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेनमध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सद्या आंतराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल 93 डॉलर असलेले तेलाचे दर वाढून 100 डॉलर प्रती बॅरल पोहोचला आहे. यामुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारताने 2021मध्ये रशियाकडून 43,400 बीपीडी तेल आयात केले आहे. जो एकूण आयात केलेल्या तेलाच्या 1 टक्के आहे. तसेच रशियाच्या नैसर्गिक वायूच्या निर्यातीत भारताचा वाटा 0.2 टक्के आहे. GAIL (इंडिया) लिमिटेडने Gazprom सोबत वार्षिक 2.5 दशलक्ष टन LNG खरेदी करण्यासाठी 20 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केल्या आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारतीय सैन्यातील 60 टक्के शस्त्रांची पुर्तता रशियाकडून होते. यामध्ये रशियाकडून मिळणाऱ्या एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमचाही समावेश आहे. जर रशिया-युक्रेन युद्ध झालंच तर रशियाकडून शस्त्रपुरवठा बंद होऊ शकतो.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रशिया आणि चीन यांच्यात चांगले संबंध आहे. जर रशिया-युक्रेन युद्ध पेटले तर चीन रशियाला समर्थन करू शकतो. एकीकडे भारत चीन सीमेवर तणाव वाढलेला असताना अशा परिस्थितीचा फायदा चीन घेऊ शकतो. याहूनही महत्त्वाचं म्हणजे, जरी भारत आणि रशियामध्ये चांगले संबंध असले तरी चीनची मदत मिळाल्यास रशिया भारताच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, यासर्व प्रकरणात अमेरिकेने युक्रेनचे समर्थन केले आहे. अशात भारताला रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ज्या प्रकारे भारत शस्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे. त्याप्रकारे इतर क्षेत्रात भारत अमेरिका आणि युरोपीय देशांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारताला मध्यम मार्ग काढावा लागणार आहे.