नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून गुजरातच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. गुरुवारी सुरतच्या सत्र न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, शिक्षेची घोषणा झाल्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना तात्काळ जामीन मंजूर केला. 2019 मध्ये कर्नाटकमधील एका सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त विधान केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?
मानहानीचा दावा: राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री पूर्णेश मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणातील सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सुरत सत्र न्यायालयाने १७ मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी वायनाडचे खासदार राहुल गांधी चौथ्यांदा कोर्टात हजर झाले. या हायप्रोफाईल सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी जवळपास 150 जवान तैनात करण्यात आले होते.
मोदी म्हणजे चोरांचे आडनाव: 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी समुदायाला विचारले की, सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे? राहुल गांधी म्हणाले होते की, फरार ललित मोदी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकच का? या वक्तव्यानंतर भाजप आमदार पूर्णेश यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. राहुल गांधी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोदी समाजाच्या भावना आरोप करण्यात आला होता. गुन्हा दाखल केला तेव्हा पूर्णेश भूपेंद्र सरकारमध्ये मंत्री होते, आता ते सुरतमधून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
राहुल गांधींनी आरोप फेटाळले : सुरत न्यायालयात गेल्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले होते. रॅलीत आपण काय बोललो ते आठवत नाही, असे राहुल कोर्टात म्हणाले. सुरत कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधी तसेच कर्नाटकातील कोलार येथील निवडणूक अधिकारी आणि भाषण रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्डर यांचे जबाब नोंदवले, त्यानंतर राहुल गांधी यांना या विधानाबाबत विचारण्यात आले.
हेही वाचा: सुरत न्यायालयाकडून राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा, काय झालं न्यायालयात?