हैदराबाद - अलिकडच्या काळात बऱ्याच लोकांनी पाठदुखीच्या तक्रारी केल्या आहेत, विशेषत: ज्यांचं वय ४० पेक्षा अधिक आहे, अशा लोकांनी. अशाप्रकारची वेदना कधीकधी आपल्या जीवनशैलीत झालेल्या असंतुलनाचा परिणाम असतो. तर कधीकधी चुकीच्या पद्धतीने तासन् तास बसून राहिल्याने किंवा आपल्या शरीरातील हाडांच्या किंवा मज्जातंतूंच्या कमतरतेमुळे ही वेदना उद्भवते. अशा वेदनांसाठी आपण बर्याचदा ‘सायटिका’ (Sciatica) हा शब्दही ऐकला असेलच. पाठीच्या दुखण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ‘सायटिका’ होय. आपल्या शरीरातील सायटिका मज्जातंतूंत समस्या निर्माण झाल्यास पाठदुखीच्या त्रासाला सुरूवात होते. पाठदुखीविषयी, तसेच त्याची लक्षणे आणि कारणांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ईटीव्ही भारतच्या सुखीभव टीमने ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. हेम जोशी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पाठदुखी वेदनेबाबत केलेले सविस्तर विवेचन पुढीलप्रमाणे..
‘सायटिका’ समजून घेताना..
डॉ. जोशी यांनी सांगितले की, सायटिका ही कंबरेच्या खालच्या भागापासून पायांच्या खालच्या भागापर्यंतच्या नसांमध्ये उद्भवणारी एक तीव्र वेदना असते. सायटिका ही आपल्या शरीरातील मज्जातंतूचे नाव आहे. हा मज्जातंतू पाठीच्या कण्यापासून सुरू होतो आणि दोन्ही पायांमध्ये खालीपर्यंत कूल्हे आणि नितंबांमधून जात असतो. या मज्जातंतूमध्ये जेव्हा एखादी समस्या उद्भवते किंवा काही कारणास्तव संबंधित शीर दबली गेल्यास ‘सायटिका’ वेदना जाणवतात. ही समस्या जसजशी वाढत जाते, तसतशी या दुखण्याबरोबरच पायात बधिरपणाही वाढत जातो. ही समस्या समजावून सांगताना डॉ. जोशी पुढे म्हणाले की, जर वेदना आणखीनच वाढत गेली तर फुट ड्रॉप किंवा अर्धांगवायूसारखी परिस्थिती उद्भवू शकते.
सायटिकाची लक्षणे
डॉ. जोशी म्हणाले की, जर तुम्हाला पाठीदुखी किंवा केवळ एका पायात खालीपर्यंत वेदनेची तीव्र सणक जाणवत असेल किंवा वेदना होत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण ही साधी पाठदुखी असण्याऐवजी ‘सायटिका’ असू शकते. याव्यतिरिक्त इतरही काही लक्षणे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीने शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. काही लक्षणे पुढीलप्रमाणे..
- कंबरेपासून पायापर्यंत तीव्र वेदना होणे, जेव्हा तुम्ही शारिरीक हालचाल करता किंवा हात-पाय हलवता तेव्हा शरिरात तीव्र सणक निर्माण होते.
- खाली बसताना कोणत्या तरी एका बाजूला वेदना जाणवणे.
- जेव्हा आपण अचानक उभे राहतो किंवा खाली बसलेलो उठून चालायला सुरू करतो, तेव्हा एका पायात अधिक वेदना अनुभवणे किंवा अगदी पोटरीपर्यंत नसांमध्ये ताण आणि वेदना जाणवणे.
- बराच वेळ एकसारख्या स्थितीत बसल्यानंतर, एका पायाला बधिरपणा येणे किंवा पायाला सुई टोचल्याचा अनुभव येणे.
- लघवी/ संडास यांसारख्या नियमित क्रियांवर नियंत्रण नसणे.
सायटिकाची कारणे
सायटिका मज्जातंतूमध्ये समस्या निर्माण होणे, हे सायटिका वेदनांचे एकमेव कारण असू शकत नाही. पाठीचा कणा किंवा आपल्या शरीरातील इतर नसाशी संबंधित विविध समस्यांमुळे देखील सायटिक वेदना होऊ शकतात. यातील काही कारणे पुढे नमूद करण्यात आली आहेत.
१. हर्निअटेड डिस्क (Herniated discs)
यालाच आपण ‘स्लिप डिस्क’ म्हणून देखील ओळखतो. अशा परिस्थितीत पाठीच्या कण्याच्या खालच्या भागापासून ते तळपायापर्यंत तीव्र वेदना जाणवतात. हे सायटिकाचे नेहमीचे आणि सामान्य कारण आहे.
२. स्पाइनल स्टेनोसिस (Spinal stenosis)
पाठीच्या कण्याचा खालचा भाग संकुचित झाल्यामुळे, सायटिका आणि आसपासच्या इतर नसांमध्ये दबाव निर्माण होतो. त्यामुळे सायटीका नसांमध्ये वेदना जाणवायला लागतात.
३. स्पॉन्डिलोलीस्थेसीस (Spondylolisthesis)
स्पॉन्डिलोलीस्थेसीस हा डिजेनेरेटिव्ह डिस्क डिसऑर्डरशी संबंधित आजाराचा एक प्रकार आहे.
४. पिरिफॉर्मिस सिंड्रोम
पिरिफॉर्मिस सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर आहे. या प्रकारात सायटिकामुळे आपल्या पिरिफॉर्मिस स्नायू अनैच्छिकपणे संकुचित पावतात किंवा घट्ट बसतात. पिरिफॉर्मिस हा अशाप्रकारचा एक स्नायू आहे, जो आपल्या मणक्याच्या खालच्या भागापासून थेट मांडीशी जोडलेला असतो. जेव्हा हा स्नायू घट्ट होतो तेव्हा त्याचा दबाव सायटिका मज्जातंतूवर पडतो. त्यामुळे सायटिकाचा त्रास सुरू होतो.
या व्यतिरिक्त, अनेकदा एखाद्या प्रभावी रसायनाचे इंजेक्शन टोचल्याने किंवा शरिरात विशिष्ठ प्रकारचा ट्यूमर तयार झाल्यास देखील ही समस्या उद्भवू शकते.
हेही वाचा - आईचे दूध सकस राहण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती
हेही वाचा - गिलॉयला भारताची राष्ट्रीय औषधी वनस्पती म्हणून मान्यता