हुगळी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस हे रामनवमीच्या दिवशी राज्यात झालेल्या हिंसाचाराचा अहवाल आज गृहमंत्रालयाला पाठवण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून हुगली आणि हावडा हिंसाचाराचा अहवाल मागवला होता. सोमवारी रात्री उसळलेल्या ताज्या हिंसाचारानंतर मंगळवारी ते हिंसाचारग्रस्त भागात तातडीच्या भेटीवर गेले होते.
प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आश्वासन : राज्यात रामनवमीला झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत ते म्हणाले की, 'चुकीचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पश्चिम बंगालमधील लोकांना शांततापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. येथे कोणत्याही किंमतीत शांतता स्थापित केली जाईल'. मंगळवारी हिंसाचारग्रस्त रिश्राच्या भेटीवर गेलेल्या बंगालच्या राज्यपालांनी परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना कधीही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील, असेही ते म्हणाले.
हुगळीत आणखी एक बॉम्बस्फोट : पश्चिम बंगालच्या हुगळीत रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला होता. सोमवारी परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच या परिसरात आणखी एक बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ममता सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था राखू शकले नसल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, भाजपच दंगल भडकावत असल्याचा आरोप तृणमूलने केला आहे.
भाजपच्या शोभायात्रेवर दगडफेक : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. रामनवमीचा सण संपला तरी मिरवणुका काढण्याची काय गरज आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. रविवारी हुगळीत भाजपने शोभा यात्रा काढली होती. या शोभायात्रेवरही दगडफेक झाली होती. गुरुवारी रामनवमीच्या दिवशी हावडा येथे दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटनेत अनेक वाहने जाळण्यात आली होती.