कोलकाता : नॉर्थ २४ परगण्यातील निमता येथे राहणारे भाजपा कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांच्या आईचे आज निधन झाले. ८५ वर्षांच्या शोभा मजुमदार यांना गेल्या महिन्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आता भाजपाचे मोठे नेते आणि कार्यकर्ते ट्विटरवर आपला रोष व्यक्त करत आहेत.
जे. पी. नड्डांनी वाहिली श्रद्धांजली..
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विटरवर शोभा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपला मुलगा गोपाल मजुमदार भाजपामध्ये असल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. भाजपा त्यांचे हे बलिदान कायम लक्षात ठेवेल. त्या बंगालच्या आई आणि मुलगी होत्या. राज्यातील आई आणि मुलींच्या सुरक्षेसाठी भाजपा नेहमीच लढत राहील, असे भावनिक ट्विट नड्डांनी केले आहे.
अमित शाह संतापले..
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही शोभा यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. तृणमूलच्या गुंडांनी ज्यांना मारहाण केली होतीस अशा शोभा मजुमदार यांच्या निधनाने मी संतापलो आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना ही घटना कायम लक्षात ठेवावी लागेल, अशा आशयाचे ट्विट शाहांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
गोपाल मजुमदार यांनी मागील महिन्यात असा आरोप केला होता, की तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या घरात घुसून आपल्याला आणि आपल्या आईला मारहाण केली. याबाबत शोभा यांनीही असेच आरोप केले होते. यानंतर सुवेंदु अधिकारी यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी शोभा यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
दरम्यान, ममता बॅनर्जींवरील कथित हल्ला असो वा शोभा यांच्यावरील कथित हल्ला; बंगालच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना समोर येताना दिसून येत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानावेळीही मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळाला होता.
हेही वाचा : दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाजवळ दोन गटात हाणामारी; व्हिडिओ व्हायरल