भटपारा (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्ता जयप्रकाश यादवचा (वय 32) बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) हल्ल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे खासदार अर्जुन सिंह घटनास्थळी पोहोचले. तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
टीएमसीच्या काही गुंडांनी आज दुपारी बॉम्ब फेकला. या हल्ल्यात कार्यकर्ता जयप्रकाश यादवचा जागीच मृत्यू झाला. एकही माणूस जगू शकत नाही, अशी बंगालमधील परिस्थिती आहे, असे खासदार अर्जुन सिंह म्हणाले.
भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येचा टीएमसीवर आरोप -
राज्यात टीएमसीने दहशत पसरवली असून भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाकडून अनेकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना टीएमसीने गेल्या पाच वर्षात भाजपाच्या 166 कार्यकर्त्यांचा बळी घेतल्याचा आरोप केला होता. तसेच टीएमसीने भाजपा कार्यकर्त्यांवर 30 हजार पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले असून विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 37 कार्यकर्ते मारले गेले आहेत, असेही ते म्हणाले होते. मात्र, टीएमसीने हे आरोप फेटाळले आहेत.
भाजपाच्या कार्यालयाजवळ सापडले 51 गावठी बॉम्ब -
आज सकाळी भाजपा कार्यालयाजवळ 51 गावठी बॉम्ब सापडले होते. भाजपा कार्यालयाजवळील खिदिरपुर मोरे आणि हेस्टिंग्स क्रॉसिंग भागात हे बॉम्ब आढळले होते. वेळेत बॉम्ब निष्क्रिय करण्यात आल्याने मोठा घात टळला. हे बॉम्ब कोणी ठेवले, याची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीही अनेक हल्ल्यांमध्ये अशा बॉम्बचा वापर दिसून आला आहे. अशाप्रकारे स्फोटकं, हत्यारं सापडणं हे पश्चिम बंगालमध्ये आता नेहमीचंच झालं आहे.