वाराणसी Weavers of Varanasi Gift Indian Players : यंदाची आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेत भारतीय संघानं चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. संघाची कामगिरी बघता 19 नोव्हेंबरला होणारा अंतिम सामना जिंकण्याच्या भारतीय संघाच्या आशा वाढू लागल्या आहेत. या विश्वचषकात भारताच्या हॅटट्रिकची क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. त्याचबरोबर अध्यात्माची नगरी असलेल्या वाराणसीमध्येही क्रिकेटचा प्रभाव दिसून येतोय. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या 15 खेळाडूंना वाराणसीचे विणकर साड्या भेट देणार आहेत. या एका साडीची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे.
विश्वचषक जिंकण्याची आशा : भारतीय क्रिकेट संघानं आपल्या विश्वचषक मोहिमेची विजयासह शानदार सुरुवात केली होती. या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय संघानं अजेय आघाडी कायम राखत उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत धडक मारलीय. त्यामुळं भारतीय संघानं पुन्हा विश्वचषक स्पर्धा जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. यामुळं भारतीय क्रिकेट संघावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निळ्या रंगाची साडी तयार : काशीच्या कश्यम सृजन फाऊंडेशनच्या विणकरांनी भारतीय संघासाठी एक अनोखी भेट तयार केलीय. या विणकरांनी विशेषतः भारतीय क्रिकेटपटूंसाठी साड्या बनवल्या आहेत. ही साडी हातमागापासून बनवली जाते. या साडीला बनवण्यासाठी सुमारे 45 दिवस लागतात. तसंच विणकरांना एक साडी बनवण्यासाठी 20 हजार रुपये खर्च येतो. भारतीय संघातील खेळाडूंसाठी निळ्या रंगाच्या साडीत सोनेरी रंगाची विश्वचषक ट्रॉफी, क्रिकेट स्टंप आणि बॅट-बॉल तयार करण्यात आलाय. त्यामुळे ही साडी आणखी सुंदर दिसते.
काशीच्या विणकरांना विजयाची आशा : कश्यम सृजन फाऊंडेशनचे विश्वस्त सर्वेश कुमार श्रीवास्तव म्हणाले की, क्रिकेट विश्वचषक सामना सुरू होण्यापूर्वीच काशीच्या विणकरांना वाटत होतं की भारतीय क्रिकेट संघ हा विश्वचषक जिंकेल. त्यामुळं भारतीय क्रिकेट संघाला खास भेट देण्यासाठी खास प्रकारची साडी बनवण्याचं काम अनोख्या शैलीत करण्यात आलंय. ही साडी डिझाईन करुन हातमागावर बनवायला खूप वेळ लागलाय. पहिली साडी बनवायला सुमारे 45 दिवस लागले. त्यानंतर दुसरी साडी बनवायला 15 दिवस लागले. आता विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर काशीच्या विणकरांना या साड्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना भेट द्यायच्या आहेत.
हेही वाचा :