नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि 3 लोकसभा जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात येत असून आज सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकींचे 2 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. 14 राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये चार, आसाममध्ये पाच, मेघालय, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी तीन जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन आणि मिझोराम, तेलंगना, नागालँड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे. तसेच लोकसभा पोटनिवडणूक ही दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्य प्रदेशातील खांडवा येथे प्रत्येकी एका जागेवर म्हणजेच एकूण तीन ठिकाणी होत आहेत.
महाराष्ट्र -
महाराष्ट्रातील देगलूर पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची लढत असून भाजपाने सुभाष साबणे आणि काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती.
पश्चिम बंगाल -
पश्चिम बंगालमध्ये कूचबिहारमधील दिनहाटा, नादियामधील शांतिपूर, उत्तर 24 परगणामधील खर्डा आणि दक्षिण 24 परगणामधील गोसाबा येथे विधानसभा पोटनिवडणूक घेण्यात येत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) हे या पोटनिवडणुकीत प्रमुख दावेदार आहेत.
आसाम -
आसाममध्ये पाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. मतदारसंघ गोसाईगाव, भबानीपूर, तामुलपूर, मारियानी आणि थौरा या पाच विधानसभा जागांवर सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे.
मेघालय -
मावरिंकनेंग, मावफ्लांग आणि राजाबाला या तीन जागांवर निवडणूक होत आहे. येथे सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे.
बिहार -
बिहारमधील तारापूर आणि कुशवेश्वर अस्थान या दोन जागांसाठी एकूण 17 उमेदवार पोटनिवडणूक लढत आहेत.
कर्नाटक -
राज्यातील सिंदगी आणि हनागल विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत.
हिमाचल प्रदेश -
हिमाचल प्रदेशमध्ये एका लोकसभा जागेसाठी आणि तीन विधानसभा जागेसाठी मतदान पार पडतंय. मंडी या लोकसभा जागेसाठी तर फतेहपूर, जुब्बल-कोथकाई आणि अर्की या तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात येत आहे.
राजस्थान -
धारियावाड आणि वल्लभनगर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. येथील दोन्ही आमदारांचे गेल्या वर्षी निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
तेलंगणा -
हुजूराबाद विधानसभा मतदारसंघात तेलंगणा राष्ट्र समिती आणि प्रमुख दावेदार भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
नागालँड आणि मिझोराम -
नागालँडमध्ये एक आणि मिझोराममध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
हरयाणा -
हरियाणातील एलेनाबाद विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. INLD नेते अभय सिंह चौटाला यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांवरून जानेवारीत आमदारकीचा राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती.
मध्य प्रदेश -
मध्य प्रदेशातील एक लोकसभेसह तीन विधानसभेच्या जागांसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मध्य प्रदेशातील रायगाव, पृथ्वीपूर आणि जोबट या तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत.
आंध्र प्रदेश -
आंध्र प्रदेशातील बडवेल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी कडेकोट बंदोबस्तात मतदान होत आहे. मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 281 मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळी 7 वाजता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतदानाला सुरुवात केली. कडप्पा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, केंद्रीय सशस्त्र दलासह 2,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सत्ताधारी YSR काँग्रेस पक्षाचे (YSRCP) आमदार जी व्यंकटसुब्बय्या यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात येत असून एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत.