हैदराबाद - दक्षिण आफ्रिकेतील डरबन क्रिकेट मैदानावर भलेही भारतीय टीमचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत असेल मात्र मैदानावर भारताचे झेंडे आणि टीम इंडियाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याचे पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेत 13 ते 15 लाख भारतीय नागरिक राहतात. यापैकी अधिकांश डरबनमध्ये राहतात. मात्र मागील अनेक दशकांपासून दक्षिण आफ्रिकेत राहणारे नागरिक सध्या स्वत:ला असुरक्षित मानत आहे. दक्षिण आफ्रिका आणि दरबन सारख्या परिसरातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे फोटो पाहून आफ्रिकेत राहणाऱ्या लोकांचे भारतातील नातेवाईक त्रस्त आहेत.
हिंसेच्या आगीत होरपळत आहे दक्षिण आफ्रिका -
अनेक वर्षापासून वर्णवादी साखळदंडात बांधलेला दक्षिण आफ्रिका सध्या हिंसेच्या आगडोंबात होरपळत आहे. गौतेंग आणि क्वाजलु नटाल राज्यांतील दंगलीमध्ये भारतीय नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. क्वाजुलु नटाल राज्यातील सर्वात मोठे शहर डरबन आहे. जेथे भारतीय वंशाचे जवळपास 10 लाख लोक राहतात.
त्यांच्या दुकांनांची लुटपाट होत असून अनेक लोक मारले गेले आहेत. दरबनमध्ये किरकोळ मालाच्या दुकानांपासून सुपर मार्केट आणि हेल्थ क्लिनीकपासून मोटर डीलरशिप भारतीय लोकांकडून चालवले जाते. दंगलखोर या दुकांनांची लूट करत आहेत. दक्षिण आफ्रिकी सरकारने गुरुवारी सांगितले, की हिंसेत आतापर्यंत 337 लोकांचा मृत्यू झाला असून यापैकी 258 मृत्यू क्वाजलु नटाल राज्यात झाले आहेत.
आंदोलनकर्त्यांनी अनेक मॉल व दुकाने आगीच्या हवाली केली आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अनेक लोकांना अटकही केली आहे.
का होत आहे हिंसा ?
दक्षिण आफ्रिकाचे माजी राष्ट्रपती जैकब झुमा यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. 2009 मध्ये राष्ट्रपती बनलेले जुमा यांना या आरोपांमुळेच 2018 मध्ये पद सोडावे लागले होते. भ्रष्टाचारच्या प्रकरणात चौकशी सुरू असताना झुमा कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टाची अवमानना प्रकरणात त्यांना 15 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली.
29 जून रोजी कोर्टाने शिक्षा सुनावली व मागील 7 जुलै रोजी जैकब झुमा यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले व हिंसेला सुरुवात झाली. जेकब झुमा यांच्या मुक्ततेसाठी सुरू झालेले हे आंदोलन हिंसक झाले व याचे सर्वाधिक नुकसान भारतीयांना सहन करावे लागले आहे.
भारतीयांना का बनवले जात आहे लक्ष्य ?
दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाचे लोक पहिल्या शतकाच्या आधीपासून रहात आले आहेत. तेथील अर्थव्यवस्थेत आपले योगदान देणाऱ्या भारतीयांनी वर्णभेदाचा काळही पाहिला आहे. दक्षिण आफ्रिकेत रंगभेद संपल्यानंतरची ही सर्वात मोठी हिंसा आहे. मात्र प्रश्न आहे, की यामध्ये भारतीयांना का निशाणा बनवले जात आहे?
काही लोक मानतात की दरबन येथे भारतीय वंशाच्या लोकांची दुकाने, शॉपिंग मॉल्स आणि अन्य संस्था आहेत. शहरात हिंसा झाल्यानंतर दंगलखोरांनी सर्वांना आपला निशाणा बनवला. मात्र काही जाणकार म्हणतात की, जैकब झुमा यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात भारतीय वंशाचे गुप्ता बंधु सामील असल्याने लोकांमध्ये भारतीयांप्रती नाराजी आहे.
वर्णभेद व काळा-गोरा भेदभावही कारण आहे ?
दक्षिण आफ्रिकेला वर्णभेद एक डाग आहे. दरबनमधील भारतीयांचे म्हणणे आहे, की सुरुवातील भारतीयांवर हल्ले झाले नाही. मात्र आंदोलन भडकल्यानंतर भारतीय लोकांना याचे चटका बसू लागला.
दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक लोकसंख्या येथील स्थानिक काळ्या लोकांची आहे. मात्र गोरे लोक अल्पसंख्याक असूनही श्रीमंत आहेत. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांची लोकसंख्या अडीच ते तीन टक्के आहे. तसे पाहायला गेले तर येथील स्थानिक व भारतीय लोकांचे संबंध चांगले राहिले आहेत. मात्र एका गटाचा आरोप आहे, की भारतीय लोक स्थानिकांबरोबर रंगवरून भेदभाव करतात.
कोण आहेत गुप्ता बंधु ?
अजय गुप्ता, अतुल गुप्ता आणि राजेश गुप्ता, हे गुप्ता ब्रदर्स आहेत ज्यांचा जैकब झुमा यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंध आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे राहणारे गुप्ता ब्रदर्स 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले व सहारा कम्प्यूटर्सची स्थापना केली. त्यानंतर मीडियापासून खान उद्योग तसेच अन्य क्षेत्रात बिझनेस केला.
जैकब झुमा गुप्ता ब्रदर्सच्या जवळचे मानले जातात. म्हटले जाते की, झुमा सरकारचा लाग गुप्ता बंधुंना मिळाला. 2016 मध्ये अतुल गुप्ता दक्षिण आफ्रिकेतील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले. झुमा यांच्यावर आरोप आहे, की त्यांनी आपल्या कार्यकाळात गुप्ता बंधुंना खुली सूट दिली व देशातील साधन संपत्तीची लूट करू दिली. 2018 मध्ये झुमा यांना राष्ट्रपती पद सोडावे लागले त्यानंतर गुप्ता ब्रदर्सनेही देश सोडला. दक्षिण आफ्रिकेत सुरू खटल्यात त्यांचे नाव आहे. त्यामुळे भारतीय लोकांवर हल्ले होत आहेत.
दोन्ही देशांचे सरकार काय करत आहे ?
7 जुलै रोजी जैकब झुमा यांच्या अटकेनंतर सुरू झालेली हिंसा दोन आठवड्यानंतरही सुरू आहे. दक्षिण आफ्रिकी सरकारने हिंसाग्रस्त भागात लष्कर तैनात केले आहे. 25 हजार सैनिक हिंसा पीडित भागात दाखल झाल्यानंतर दंगली आटोक्यात आल्या. मात्र भारतीय लोकांमध्ये अजूनही दहशत आहे. दरम्यान भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण आफ्रिकेचे विदेश मंत्री नलेदी पंडोर यांच्याशी बातचीत केली.
दोन गांधींच्या देशात हिंसा -
दक्षिण आफ्रिका असा देश आहे, ज्याला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपली कर्मभूमी बनवले होते. 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या महात्मा गांधींचे विचार अजूनही तेथे जिवंत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे गांधी अशी ओळख असणाऱ्या नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधींचे विचार पुढे नेले. मंडेला यांनी रंगभेदाच्या विरुद्ध लढाई केली व 27 वर्षे तुरुंगात काढली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत लोकशाही सुरू झाली. मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनले. मात्र वर्णभेदाची चौकट भेदून देशात लोकशाही स्थापित करणाऱ्या मंडेला यांचा देश हिंसेत जळत आहे.