भोपाळ: रविवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये जातीय हिंसाचार उसळला. हिंसाचाराची पहिली घटना खरगोन जिल्ह्यात झाली तेथे सुमारे सहा पोलीस जखमी झाले तर बरवानी जिल्ह्यातील सेंधवा शहरात अशीच दुसरी घटना घडल्याचे समोर आले आहे. खरगोनमध्ये, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, जाळपोळीच्या घटना घडल्या ज्यात काही वाहनांना आग लागली, अधिकाऱ्यांना तीन भागात कर्फ्यू आणि संपूर्ण शहरात कलम 144 लागू केले आहे.
या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्राथमिक माहितीनुसार दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि लोक जखमी झाले आहेत. मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यास आक्षेप घेत विशिष्ट समाजातील लोकांनी मिरवणुकीवर हल्ला केला. यामुळे दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला आणि त्यानंतर दगडफेकीची तक्रार नोंदवली गेली.
परस्थिती चिघळल्या मुळे पोलिसांची तारांबळ उडाली. तसेच गोंधळ निर्माण करणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. इतर स्थानिक पोलिस ठाण्यांतील अतिरिक्त पोलीस दलाला सतर्क करण्यात आले तसेच त्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे यावर कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली, अशी माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.
खरगोन जिल्हा प्रशासनाने रविवारी उशिरा लोकांना अफवा पसरवण्यापासून रोखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले. "शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीकडे लक्ष देऊ नका," असे खरगोनचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एसएस मुजल्डा यांनी रविवारी उशिरा एका आवाहनात सांगितले.
रामनवमीच्या मिरवणुकीत बरवानी जिल्ह्यातील सेंधवा शहरातही असाच हिंसाचार झाला होता. या घटनेत एका पोलीस निरीक्षकासह पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. एका प्रार्थनास्थळाचीही तोडफोड करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ई जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.