विजयपुरा (कर्नाटक) : एका महिलेची छेड काढल्यामुळे मुंडण करण्यात आलेल्या दोन तरुणांसह मुंडणाचा आदेश देणाऱ्या पंचायतीतील सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी कर्नाटकातील विजयपुरा तालुक्यात घडली. हे दोन तरुण महाराष्ट्रात कामानिमित्त आले असताना त्यांनी तेथे एका महिलेशी असभ्य वर्तन केले. महिलेने ही बाब तिच्या मेहुण्याला सांगितली. त्यानंतर या संदर्भात गावातील ज्येष्ठांनी या दोन तरुणांना गावी बोलावून गावच्या पंचाईतीत त्या तरुणांचे मुंडण करण्याचा आदेश दिला होता.
व्हिडिओ व्हायरल : कर्नाटकच्या विजयपुरा तालुक्यातील हेगडीहाळा येथे महिलेची छेडछाड व असभ्य वर्तन केल्याप्रकरणी जुळ्या भावांचे मुंडण करून गळ्यात चपलांचा माळा घातल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विजयपुरा ग्रामीण पोलिसांनी गावात भेट देऊन चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आले.
काय आहे प्रकरण? : कर्नाटकातील दोन भाऊ कामासाठी महाराष्ट्रात गेले होते. तर ती महिला आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रात कामासाठी गेली होती. यावेळी तरुणांनी तिची छेडछाड करत असभ्य वर्तन केले. ही बाब समाजाच्या नेत्यांना कळताच त्यांनी तरुणांना गावात बोलावले. त्यांनी महिलेचा विनयभंग करून आपल्या समाजातील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या दोन तरुणांचे मुंडण करून हेगडीहाळा तांडा येथे त्यांची परेड केली. त्यानंतर पोलिसांनी दोन तरुणांसह मुंडणाचा आदेश देणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले.
प्रेमी जोडप्याला विचित्र शिक्षा : गेल्या वर्षी न्याय पंचायतीने एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्याला विचित्र शिक्षेचा आदेश दिल्याची अमानुष घटना ओडिशाच्या मयूरबंजमध्ये उघडकीस आली होती. ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते तिला भेटण्यासाठी हा तरुण शेजारच्या गावात गेला होता. यावेळी स्थानिकांनी प्रेमीयुगुलांना एकाच खोलीत पाहिले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी न्याय पंचायतीसमोर हजर करण्यात आले. यावेळी स्थानिक पंचायतीने दोघांनाही मुंडण करून मोर्चा काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांचे मुंडण करून गावातील प्रमुख रस्त्यावरून त्यांची मिरवणूक काढली.