जयपूर - येथील एका हॉटेलमधील बर्गरमध्ये विंचू सापडल्याची घटना उघडकीला आली आहे. तरुणाने हा बर्गर अर्धा खाल्ल्यानंतर त्यात विंचू असल्याचे समजले. यानंतर तरुणाची तब्येत बिघडली असून, त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा - 'त्या' वक्तव्यावरुन रुपाली चाकणकरांची प्रविण दरेकरांविरोधात तक्रार दाखल
- तरुणाला केले रुग्णालयात दाखल -
जयपूरमधील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये तरुण मित्रांसोबत बर्गर खाण्यासाठी गेला होता. तरुणने दोन बर्गर ऑर्डर केले. त्यातील एक बर्गर मित्राला दिला, तर दुसरा स्वतः घेतला. बर्गर खाताच त्याला तोंडात काहीतरी वेगळी चव लागत असल्याचे समजले. तेव्हा त्याने घास बाहेर काढल्यावर त्यात मेलेल्या विंचूचा अर्धा भाग असल्याचे दिसले.
दरम्यान, या प्रकरणाची कल्पना त्या दोघांनी हॉटेलच्या स्टाफला दिली. मात्र, यात हॉटेलची काहीच चूक नसल्याचा कांगावा स्टाफकडून करण्यात येत होता. यानंतर हॉटेल स्टाफ आणि त्या तरुणांमध्ये वाद सुरू झाला. याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
- बर्गरचे नमुने तपासणीसाठी पाठवले -
हा प्रकार सुरू असतानाच तरुणाची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी या बर्गरचे नमुने तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. जयपूरमधील एका नामांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
हेही वाचा - पोलिसांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे - किरीट सोमैया