लखनौ - गाड्यांवर जातीवाचक स्टीकर लावले असल्यास यूपी सरकार संबंधित गाडी जप्त करणार आहे. अशा गाड्यावर रस्त्यांवर आढळल्यास जाग्यावरच कारवाई केली जाणार आहे. उत्तर प्रदेश परिवहन विभागाचे अप्पर परिवहन आयुक्त (प्रशासन) मुकेश चंद्रा यांनी याविषयीचे आदेश जारी केले आहेत.
कलम 177 अंतर्गत होणार कारवाई -
उत्तर प्रदेशचे अप्पर परिवहन आयुक्त (प्रशासन) मुकेश चंद्रा यांनी सांगितले, की आता वाहनांवर जातीवाचक शब्द आढळल्यास कलम 177 अंतर्गत चालान किंवा गाडी जप्तीची कारवाई केली जाईल. हा आदेश राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे, की नंबर प्लेटवर जातीचा उल्लेख करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. अशी वाहने जप्त करण्याबरोबरच दंडात्मक कारवाईही केली जाईल. तपासणी दरम्यान अशी वाहने दुसऱ्यांदा आढळल्यास अशा वाहनांवर दुप्पट दंड आकारण्यात यावा. तिसऱ्यांदा वाहन सापडल्यास वाहनधारकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जाईल.
महाराष्ट्रातील एका शिक्षकाने पीएमओकडे केली होती तक्रार -
उत्तर प्रदेश सरकारला पंतप्रधान कार्यालयाकडून पाठवलेल्या एका पत्रानंतर परिवहन विभागाने हा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभु यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना याविषयी पत्र पाठवले होते. वाहनांवर जातीचा उल्लेख करणे सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक म्हटले होते.
नंबर प्लेटवर नंबरशिवाय दुसरे काहीच नसावे -
परिवहन विभागाच्या वाहन नियमावलीनुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर नंबराशिवाय दुसरे काहीच लिहिलेले नसावे. गाडीवर असणारा नंबर स्पष्टपणे दिसायला हवा. परिवहन विभागाच्या नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर कोणताही जातीवाचक शब्द लिहिल्यास तो दंडणीय अपराध असेल.
लखनौ पोलिसांची पहिली कारवाई, गाडी जप्त -
गाडीवर जातीवाचक शब्द असलेल्या गाड्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. एका मारुती व्हॅनच्या मागेच्या काचेवर 'सक्सेना जी' लिहिले होते. UP 78 EW 3616 नंबर असणाऱ्या या गाडीला थांबवून पोलिसांनी चालान ठोकले. लखनौमधील ही पहिली कारवाई आहे.