उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarakhand Tunnel Rescue : उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ७ राज्यांतील ४१ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. कामगारांनी १७ दिवस जीवनाची लढाई अप्रतिमपणे लढली आणि जिंकली देखील, हा मोठा चमत्कार आहे. यंत्रणा आणि देश-विदेशातील शास्त्रज्ञांचे परिश्रमही यात होते. कामगारांना बाहेर काढण्यासाठी राज्यापासून केंद्रापर्यंत सर्वांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र या १७ दिवसांत मोठमोठी यंत्रे पराभूत होत असताना, बचावकार्याच्या शेवटच्या काही तासांत देशाच्या शूर सैनिकांनी आणि त्यांच्या सोबतच्या कामगारांनी आपल्या हातांनी डोंगर फोडण्याचं काम केलं.
हातोडा आणि छन्नीच्या मदतीनं खोदलं : 'मद्रास सॅपर्स' या भारतीय सैन्याच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सच्या तुकडीने बचाव कार्याची कमान हाती घेतली होती. त्यांनी अडकलेल्या कामगारांना मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे वाचवलं. जेव्हा बचाव प्रक्रिया सुरू झाली तेव्हा हातोडा आणि छन्नीच्या मदतीनं शेवटचा अडथळा पार केला जाईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं. रॅट मायनिंग तज्ञांनी हळूहळू महाकाय पर्वत फोडला आणि दाखवून दिलं की प्रयत्न करताना कधीही हार होत नाही. सुमारे ९ मजूर आणि १२ सैन्याचे जवान या कमाला जुंपले होते.
मशीन्ससह काम करणं धोकादायक होतं : रॅट मायनिंग तंत्राचा वापर करून डोंगर फोडण्यासाठी त्यांना सुमारे १६ ते १७ तास लागले. यापूर्वी सुमारे ८ कृती आराखड्यांवर काम करून अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु तज्ञांनी सांगितलं की, मशीन्ससह काम करणं धोकादायक आहे. त्यामुळे आणखी समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या जगातील अत्याधुनिक यंत्रांनी जवळपास काम बंद केलं. या यंत्रांसमोर कधी लोखंडी रॉड तर कधी कठीण डोंगर अडसर ठरत होते. त्यामुळे एक ते दोन दिवस बचावकार्य थांबवावं लागलं. त्यानंतर मग हातानं काम करायचं ठरलं.
कामगार १७ दिवसांनंतर बाहेर आले : ऑपरेशनच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा पाईप शेवटपर्यंत पोहचला, तेव्हा सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांनीही आनंद साजरा करत देवाचं आभार मानले. आतील कामगार आनंदानं नाचत होते. या पाइपद्वारे इकडून तिकडे आवाज पोहचवण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. सध्या सर्व ४१ कामगारांना बोगद्यातून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे तात्पुरतं स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलंय. तेथे डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. १७ दिवसांपासून अंधाऱ्या कोठडीत बंद असलेले हे कामगार जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनीच नव्हे तर संपूर्ण देशानं सुटकेचा नि:श्वास सोडला.
हेही वाचा :