देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हे राजीनामा देणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता राज्यमंत्री धनसिंह रावत यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज सकाळीच त्रिवेंदसिंह रावत हे दिल्लीहून उत्तराखंडला रवाना झाले आहेत. तर, मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह यांनी पाठवलेल्या विशेष हेलिकॉप्टरने धनसिंह रावतदेखील श्रीनगरहून देहराडूनला रवाना झाले आहेत.
याप्रकरणी भाजपाचे प्रवक्ते मुन्ना सिंह चौहान यांनी सांगितले, की मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह दुपारी तीनच्या सुमारास स्वतः माध्यमांशी संवाद साधतील. दरम्यान, त्रिवेंद्रसिंह यांच्या राजीनाम्याच्या माहितीनंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी एकच गर्दी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री काही वेळातच राजभवनात पोहोचून राज्यपालांकडे आपला राजीनामा देणार आहेत. मात्र याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
त्रिवेंद्र सिंह यांचा केवळ एक वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना, अशा प्रकारे राजीनामा का देणार आहेत याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.