नवी दिल्ली NCRB Report 2022 : देशात सर्वाधिक दंगलीचे प्रमाण महाराष्ट्रात असून 2022 मध्ये 8,218 दंगलींची नोंद झालीय. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आलीय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एनसीआरबीनं सोमवारी 'क्राइम इन इंडिया 2022' अहवाल जारी केला. या अहवालानुसार, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमांखाली फौजदारी गुन्हे नोंदवण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर यात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रात गुन्हेगारीची आकडेवारी धक्कादायक : 2022 मध्ये 2,295 हत्यांसह महाराष्ट्र प्रथम, उत्तर प्रदेश द्वितीय आणि बिहारनंतर खून प्रकरणांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशनंतर बलात्काराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचंही आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. महाराष्ट्रात बलात्काराचे 2904 गुन्हे दाखल झाले आहेत. अहवालानुसार, महाराष्ट्रात 2022 मध्ये एकूण 3,74,038 गुन्हे नोंदवले गेले. तर 2021 मध्ये 3,67,218 आणि 2020 मध्ये 3,94,017 गुन्ह्याचे प्रमाण राहिले.
महाराष्ट्रात दंगलीच्या घटना वाढल्या : गतवर्षी महाराष्ट्रात दंगलीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यानं दंगलीचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात राहिले. अहवालात असं नमूद केलंय की, हे प्रकरण आयपीसीच्या कलम 147 ते 151 अंतर्गत नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात दंगलीचे एकूण 8218 गुन्हे दाखल झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येते.
इतर आकडेवारी : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये दिल्लीत परदेशी लोकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 48 टक्क्यांनी वाढ झालीय. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये दिल्लीत विदेशी लोकांविरुद्ध एकूण 40 गुन्ह्यांची नोंद झाली होती. हे प्रमाण 2021 मध्ये नोंदवलेल्या 27 गुन्ह्यांपेक्षा जास्त आहे. पण 2020 मध्ये दिल्लीत नोंदवलेल्या विदेशी लोकांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या 62 गुन्ह्यांपेक्षा हे कमी आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत परदेशी नागरिकांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये 20 टक्के घट नोंदवली गेलीय. 2022 मध्ये दिल्लीत परकीयांकडून केलेल्या गुन्ह्यांची एकूण 256 प्रकरणं नोंदवण्यात आली होते. तर 2021 मध्ये ही संख्या 322 आणि 2020 मध्ये 168 होती.
भारतात दररोज 78 लोकांची हत्या : देशात दर तासाला तीनहून अधिक लोकांची हत्या होत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालात ही बाब उघड झालीय. 'क्राइम इन इंडिया-2022' शीर्षकाच्या अहवालात असं म्हटलंय की 2022 मध्ये भारतात गेल्या वर्षी एकूण 28,522 खुनाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. ज्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की दररोज सुमारे 78 लोकांची हत्या करण्यात आली. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा थोडा कमी आहे.
43.92 टक्के खुनाचे गुन्हे दाखल : अहवालानुसार, 2021 मध्ये 29,272 आणि 2020 मध्ये 29,193 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात सर्वाधिक 3491 एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बिहारमध्ये 2930, महाराष्ट्रात 2295, मध्य प्रदेशात 1978 आणि राजस्थानमध्ये 1,834 गुन्हे दाखल झाले आहेत. 43.92 टक्के खुनाच्या गुन्ह्यांची नोंद या पहिल्या पाच राज्यांमध्ये झालीय.
हेही वाचा :