लखनौ - उत्तरप्रदेश विधानसभा 2022 (UP Election 2022) निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे गोरखपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी नेते उमेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभावती शुक्ला यांना समाजवादी पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली होती. तसेच योगींविरोधात आजाद समाज पार्टीचे चंद्रशेखर, बसपाचे ख्वाजा शम्सुद्दीन आणि काँग्रेसकडून चेतना पांडे यांनी निवडणूक लढवली होती.
योगी आदित्यनाथ यांचा मागील कार्यकाळ -
19 मार्च 2017 रोजी योगींनी यूपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. योगी आदित्यनाथ यांनी 1998 साली वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांचा जन्म 05 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात एका गढवाली क्षत्रिय कुटुंबात झाला.
योगी आदित्यनाथ यांनी इतिहास रचला -
उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्ता राखेल अशी शक्यता कलानुसार दिसून येत आहे. असे झाल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील. कारण याआधी भाजपचा एकही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवू शकलेला नाही. आतापर्यंत उत्तरप्रदेशात कल्याण सिंह, रामप्रकाश गुप्ता, राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले असून, यापैकी कोणालाही दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याकडे नवा विक्रम करण्याची संधी आहे.