वॉशिंग्टन डी. सी - भारत पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीच्या सर्व नियम आणि करारांचे काटेकोरपणे पालन करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. संयुक्तरित्या पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली. या कृतीचे अमेरिकेने कौतुक केले असून दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पसाकी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारत-पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना सर्सास घडतात. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेश (डीजीएमओ) या अधिकाऱ्यांनी फोनवर चर्चा केली. सीमेसंबंधीचे सर्व करार आणि नियमांचे पालन करण्याबाबत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांत एकमत झाले आहे. सर्व करारांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सविस्तर आणि खुलेपणाने चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी चर्चेत महत्त्वाची भूमिका निभावल्याचे बोलले जात आहे.
सीमेवरील कळीचे प्रश्न चर्चेने सोडवणार -
सीमेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही देशांतील कळीचे मुद्दे सोडविण्यातील येतील. सीमेवरील शांतता दोन्ही देशांच्या हितासाठी असून हिंसाचार थांबवून शांतता निर्माण करण्यास दोन्ही देश तयार झाले आहेत. सीमा नियमांचे काटेकोपणे पालन करण्याचेही मान्य करण्यात आले आहे. काल(गुरुवार) पासूनच सीमा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे मान्य केले आहे. बॉर्डर फ्लॅग मिटिंगद्वारे सीमेवरील कोणतीही परिस्थिती हाताळण्यात येईल, यावर अधिकाऱ्यांत एकमत झाले.
शस्त्रसंधी उल्लंघनामुळे काश्मीर अशांत -
जम्मू काश्मीरमध्ये भारत पाकिस्तान सीमा कायमच अशांत असते. पाकिस्तानकडून अनेक वेळा काश्मिरात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शांततेचा भंग करण्यात आला आहे. सीमेवरील विविध चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार झाला. यात भारताचे अनेक जवान शहिद झाले आहेत. भारताने प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचेही अनेक जवान आणि सीमेलगत राहणारे नागरिक ठार झाले आहे. सीमेवरील गावकऱ्यांच्या मालमत्तेचेही गोळीबारात नुकसात होते. त्यामुळे गावकऱ्यांत कायम भीतीचे वातावरण राहते. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून आज अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे मान्य केले.