लखनऊ - कोरोना विरोधातील लसींच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात असून आणीबाणीच्या काळात परवाना देण्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मात्र, त्याआधीच अनेक राज्यांनी लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश राज्यात तीन टप्प्यात लसीकरण कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
तीन टप्प्यात होणार लसीकरण -
राज्य सरकारने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात लष्कर, पोलीस कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे सर्वात आधी त्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना लस मिळणार आहे. अनेक राज्यांनी याच धर्तीवर नियोजन केले आहे.
ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, ते लस देण्यासाठी पात्र नसतील. लस साठवणूकीसाठी शीतगृहे आणि पुरवठा साखळी उभारण्यात आली आहे. सुमारे २ लाख लिटर लस साठवणूकीची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे.