खगरिया (बिहार) : बिहारच्या खगरियामध्ये प्रेमाची एक आगळी वेगळी कहाणी पाहायला मिळाली आहे. पतीची फसवणूक करून पत्नीने प्रियकराशी लग्न केल्यावर संतापलेल्या पतीने असा बदला घेतला की सगळेच अचंबित झाले. महिलेच्या पतीने चक्क प्रियकराच्या पत्नीशीच लग्न केले आहे! या अनोख्या लग्नाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे. या प्रकरणातील मजेशीर बाब म्हणजे या दोन्ही पत्नींचे नाव रुबी आहे. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने हा अनोखा विवाह पार पडला आहे.
पळून जाऊन केले लग्न : हे प्रकरण खगरियाच्या चौथम ब्लॉकमधील हरदिया गावातील आहे. येथील नीरजचा 2009 मध्ये पसरहा गावातील रुबी देवीसोबत विवाह झाला होता. दोघांना चार मुले असूनही रुबी देवीचे पसराहा गावात राहणाऱ्या मुकेशसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. मुकेश देखील विवाहित होता आणि त्याला दोन मुले होती. प्रेम करायला वय नसतं असं म्हणता येईल, ही म्हण रुबी आणि मुकेश यांनी नुकतीच खरी करून दाखवली. फेब्रुवारी 2022 मध्ये दोघांनी पळून जाऊन लग्न केले. दोघेही आपल्या दोन मुली आणि एका मुलासह गावातून पळून गेले.
पतीने घेतला अनोख्या पद्धतीने बदला : हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजला त्याची पत्नी प्रियकर मुकेशसोबत पळून गेल्याचे समजताच नीरजने पसराहा पोलीस ठाण्यात मुकेशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नीरजने सांगितले की, गावात अनेकवेळा पंचायतही झाली पण मुकेशला ते मान्य नव्हते. त्यानंतर त्याने पळून जाऊन लग्न केले. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी फसवणूक झालेल्या नीरजने मुकेशच्या पत्नीशी लग्न केले. विशेष म्हणजे दोन्ही तरुणांच्या पत्नीचे नाव रुबी आहे. मानसी ब्लॉकच्या आमनी गावात राहणाऱ्या रुबीसोबत मुकेशचे लग्न झाले होते. पहिल्या पत्नीला सोडून तो नीरजच्या पत्नीसोबत पळून गेला.
दोघांच्याही पत्नीचे नाव रुबी : फसवणूक झालेला नीरजने मुकेशचा बदला घेण्यासाठी त्याच्या पत्नीला फोन लावला. योगायोगाने दोघांच्या पत्नीचे नाव रुबी आहे. नीरज आणि मुकेशची पत्नी रुबी यांच्यात आठवडाभर चर्चा होती. त्यानंतर दोघांचे बोलणे झाले आणि दोघांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी पळून जाऊन मंदिरात लग्न केले. नीरज टाटा कंपनीत काम करतो तर मुकेश मजुरी करतो. मात्र, या लग्नाची बातमी गावापासून शहरापर्यंत खूप चर्चेत राहिली आहे.
मित्राने केला मित्राचा खून : हैदराबादमधील अब्दुल्लापूरमेट उपनगरात रविवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपला जिवलग मित्र आपल्याच गर्लफ्रेंडवर प्रेम करतो, या गोष्टीवरून एका युवकाने मित्राची अमानूष हत्या केली. त्याने आपल्या मित्राला गेट टुगेदर पार्टीचा बहाना करून घरी बोलावले आणि संधी मिळताच त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपीने घाबरून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.