नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेला एकूण 2.4 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक वाटप आहे.
वंदे भारत एक्सप्रेस वाढवणार : त्या म्हणाल्या की, कोळसा, खते आणि अन्नधान्य क्षेत्रासाठी 100 महत्त्वाच्या परिवहन पायाभूत सुविधा प्रकल्पांची निवड केली गेली आहे. यांना 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राधान्य दिले जाईल. त्यापैकी 15,000 कोटी रुपये खाजगी क्षेत्रातील असतील. त्या म्हणाल्या की, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन राजधानी, शताब्दी, दुरांतो, हमसफर आणि तेजस सारख्या प्रमुख गाड्यांचे 1,000 हून अधिक डबे नूतनीकरण करण्याची योजना रेल्वे आखत आहे. या डब्यांचे आतील भाग प्रवाशांच्या सोयीनुसार सुधारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जलद गतीने प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेस अधिक ठिकाणी सुरू करण्याची योजना आखली आहे.
35 हायड्रोजन इंधनावर आधारित गाड्या : या अर्थसंकल्पात सरकारने 35 हायड्रोजन इंधनावर आधारित गाड्या, साइड एंट्रीसह 4,500 नवीन डिझाइन केलेले ऑटोमोबाईल वाहक कोच, 5,000 LHB कोच आणि 58,000 वॅगन तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 1.37 लाख कोटी रुपये भांडवली खर्चासाठी आणि 3,267 लाख कोटी रुपये महसुली खर्चासाठी ठेवण्यात आले होते.
नवीन योजनांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी : 2013-14 च्या तुलनेत रेल्वेचा हा अर्थसंकल्प जवळपास 9 पट अधिक आहे. रेल्वेमध्ये 100 नवीन योजना सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय नवीन योजनांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आता एका लाख किलोमीटरची लाईन टाकण्यासाठी सुमारे 20 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच पायाभूत सुविधांमध्ये गुतवणूक वाढवली जाईल. भांडवली गुंतवणूक सलग तिसऱ्या वर्षी 33 टक्यांनी वाढून 10 लाख कोटी झाली आहे.
गेल्या अर्थसंकल्पात 1.4 लाख कोटीं : गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी रेल्वे मंत्रालयाला 1.4 लाख कोटींची तरतूद केली होती. 2017 पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जात होता. पण मोदी सरकारने ही परंपरा संपवली. अरुण जेटली हे पहिले अर्थमंत्री होते, ज्यांनी सामान्य अर्थसंकल्पासह रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करून तो सादर केला. ही परंपरा 1924 पासून सुरू होती. व्हिजन 2024 मध्ये रेल्वेने नवीन समर्पित फ्रेट कॉरिडॉर आणि हाय स्पीड पॅसेंजर कॉरिडॉर सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गर्दीच्या मार्गांवर मल्टी-ट्रॅकिंग, सिग्नलिंग यंत्रणा सुधारली जाईल. एका अंदाजानुसार एक लाख किलोमीटरची लाईन टाकण्यासाठी सुमारे 20 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.
हेही वाचा : Budget 2023 : ७ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार - अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा