न्यूयार्क - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने लस तयार करण्यात आल्या आहेत. भारताने कोव्हिशील्ड लस आतापर्यंत भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार देशांना पाठवली आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गात भारताची सगळ्या देशांना मदत करणं एक कौतूकाची बाब असून अनेक देशांनी भारताचे आभारही मानले आहेत. यातच संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारताचे कौतूक केले आहे.
जागतिक कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केले आहे. तसेच भारताची लस उत्पादन क्षमता ही जगातील सर्वात जमेची बाजू असल्याचं गुटेरेस म्हणाले.
भारताकडे कोरोना लस उत्पादन करण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आम्ही भारतीय संस्थाच्या संपर्कात आहोत. जागतिक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा भारताकडे उपलब्ध आहेत. सध्याच्या काळात ही जगाकडे असलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
भारताचा 'शेजारधर्म' -
कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी अमेरिका, युरोपसह अनेक देशांनी लसीकरण सुरू केले आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. भारताने शेजारील देशांनाही मानवतेच्या भावनेतून लस देण्याचा निर्णय घेतला आहे. म्यानमार, सेशल्स आणि मॉरिशस या देशांना सीरम कंपनीच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा केला आहे. नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेशलाही भारताकडून कोरोना लस देण्यात आली. आतापर्यंत भारताने ५५ लाख डोस आपल्या शेजारच्या देशांना दिले आहेत.