डेहराडून - उत्तराखंड जिल्ह्यातील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्यानंतर आत्तापर्यंत ५५ मृतदेह हाती लागले आहेत. अनेक कामगार अद्यापही बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे. चमोली पोलिसांनी याची माहिती दिली. स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांनी बचावकार्यात सहभाग घेतला आहे.
२९ मृतदेहांची ओळख पटली -
तपोवन बोगद्यात काल (सोमवार) तीन आणखी मृतदेह हाती लागले आहेत. आत्तापर्यंत ५५ मृतदेह आणि २२ मानवी अवयव सापडले आहेत. यातील २९ मृतदेहांची ओळख पटली आहे. अज्ञात मृतदेहाचे डीएन जतन करून ठेवण्यात आल्याचे चमोली पोलिसांनी अधिकृत वक्तव्य जारी करत सांगितले.
गाळ काढण्याचे काम अद्यापही सुरूच -
इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके आणि स्थानिक पोलिसांनी बचावकार्यात सहभाग घेतला असून जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. १७९ बेपत्ता कामगारांचा अहवाल जोशीमठ पोलीस ठाण्यात देण्यात आला असून बचाव आणि मदकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपोवन ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात १३५ मीटर आत जाण्यात बचाव पथकाला यश आहे असून मृतदेह काळजीपूर्वक बाहेर काढण्यात येत असून कुटुंबीयांच्या हाती सोपविण्यात येणार असल्याचे ऊर्जा प्रकल्पाच्या संचालकांनी सांगितले.