चमोली (उत्तराखंड) Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज (३ नोव्हेंबर) उत्तराखंडच्या बद्रीनाथ धाम येथे पोहोचले. येथे त्यांनी भगवान बद्रीनाथचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली.
सहकुटुंब बद्रीनाथला पोहचले : उद्धव ठाकरे आज सहकुटुंब बद्रीनाथला पोहचले. तेथे त्यांनी विशेष पूजेला उपस्थिती लावली. उद्धव ठाकरे यांचं सिंहद्वारा येथे बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशोर पनवार यांनी प्रसाद आणि शाल भेट देऊन स्वागत केलं. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना उद्धव ठाकरेंची ही बद्रीनाथ भेट विशेष महत्वाची मानली जात आहे.
राष्ट्रपतीही देणार बद्रीनाथला भेट : या वर्षीच्या चारधाम यात्रेच्या समारोपाला अवघे काही दिवस उरले आहेत. १४ नोव्हेंबरला गंगोत्री धामचे दरवाजे बंद होतील. तर यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे १५ नोव्हेंबरला बंद होणार आहेत. १८ नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होणार आहेत. चारधाम यात्रेची सांगता होण्यापूर्वी बद्री-केदार मंदिराला देशभरातील ज्येष्ठ नेते आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींचं भेट देणं सुरू आहे. ८ नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बद्रीनाथ भेट प्रस्तावित आहे. तर, कथाकार पंडित धीरेंद्र शास्त्री ५ नोव्हेंबरला केदारनाथला पोहोचणार आहेत.
रेकॉर्डब्रेक यात्रेकरूंनी बद्रीनाथ धामला भेटी दिली : उत्तराखंडमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांची ये-जा सुरू आहे. गेल्या काही महिन्यात अनेक व्हीव्हीआयपी लोक भगवान बद्रीनाथ आणि बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बद्रीनाथ आणि केदारनाथच्या दर्शनासाठी पोहचले होते. विशेष म्हणजे, यावर्षी रेकॉर्डब्रेक यात्रेकरूंनी बद्रीनाथ धामला भेटी दिली आहे.
हेही वाचा :