बंगळुरू : कर्नाटकच्या बंदीपूरमध्ये असलेल्या नुगु वन्यजीव अभयारण्यात वाघाचे तीन बछडे आढळून आले होते. या तिघांचीही अवस्था उपासमारीमुळे अगदीच खराब झाली होती. त्यांना उपचारासाठी म्हैसूरच्या प्राणीसंग्रहालयात नेण्यात येत असताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बछड्याचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला, तर उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने दुसऱ्या बछड्याला आपले प्राण गमवावे लागले. तिसऱ्या बछड्याला सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
उपासमारीमुळे मृत्यू, आईचा शोध सुरू..
या बछड्यांचा मृत्यू उपासमारीमुळेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात निश्चित झाले. सध्या त्यांच्या आईचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वनअधिकाऱ्यांना जिथे हे बछडे आढळले होते, त्याठिकाणी वाघिणीच्या पावलांचे ठसे मिळाले आहेत. या भागात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आता तिचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रोजेक्ट डिरेक्टर एस. आर. नटेश यांनी दिली.
हेही वाचा : 'हिट अँड रन' प्रकरणात इंजिनिअरला अटक; पाहा अपघाताचा व्हिडिओ..