कानपूर (उत्तरप्रदेश) - किदवई नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाल कॉलनीत गुरुवारी रात्री प्रेमप्रकरणावरून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. ( Kanpur Love Affair ) दुसऱ्या समाजातील तरुणीसोबत एक तरुण गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. ( Two Communities Faceoff Kidvai ) माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांचे कारवाईचे आश्वासन - विशेष म्हणजे प्रेमप्रकरणावरून दोन समाजाचे लोक समोरासमोर आले होते. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. दोन दिवसांपूर्वी महानगरातील किदवई नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यात कारवाई न झाल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना कसेबसे शांत करून घरी पाठवले.
याठिकाणी तरुणीच्या घरी पोलीस ठाण्यातून परतल्यानंतर आरोपी तरुणाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. घटनास्थळी पोहोचताच किदवई नगर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. यादरम्यान दोन्ही समुदाय एकमेकांसमोर आले आणि दगडफेकही झाली. वातावरण तापलेले पाहून तत्काळ पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पाचारण करण्यात आला. यानंतर दोन्ही बाजू शांत झाल्या. सध्या आरआरएफचे जवान घटनास्थळी तैनात आहेत.