गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - लग्न होत नाही म्हणून थेट पोलीस ठाण्यात गेलेल्या अजिमचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमुळेच त्याला आता बायको मिळण्याची शक्यता आहे. गाझियाबादच्या रेहानाचे कुटुंबीयही तिच्यासाठी योग्य वर शोधत होते. त्यांचा शोध हा व्हिडिओ पाहून संपला आहे. रेहानाच्या एका नातेवाईकाने अझिमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी रेहानासाठी मागणी घातली आहे.
काय आहे प्रकरण -
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैरानामध्ये राहणाऱ्या अजिमला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. काही दिवसांपूर्वी अजिम मुलगी मिळत नाही, ही तक्रार घेऊन शामलीच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. २६ वर्षीय अजिम यापुर्वी उत्तर प्रदेशच्या अनेक मोठ्या नेत्यांना भेटून स्वतःच्या लग्नासाठी मुलगी शोधण्याची मागणी केली होती. मात्र, सगळीकडून त्यांना निराशाच झाली. नेमकी हीच स्थिती रेहानाच्या कुटुंबीयांचीदेखील आहे. २५ वर्षाच्या रेहानासाठी मुलगा मिळत नाहीए. रेहानाची उंची अडीच फूट आहे. तिला घरातील सर्व कामं जमतात, मात्र केवळ उंचीमुळे तिचं लग्न होत नाहीये..
मुलीसाठी मुलगा मिळत नसल्याने चिंतेत -
मुलीचे लग्न होत नसल्याने आम्ही चिंतेत आहोत. मात्र, अजिम यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरं वाटतंय. सगळं जमून आलं आणि अजिम रेहानाची जोडी जमल्यास आमची चिंतादेखील संपेल. आम्ही मेल्यानंतर आमच्या मुलीला कोण सांभाळेल, त्यामुळे या दोघांचे लग्न झाल्यास आम्हाला खूप आनंद होईल. आमची मुलगी शिकलेली असून तिला घरातील सर्व कामे येतात, असे रेहानाचे वडील सांगतात.
असं म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात आणि प्रत्येकासाठी कोणी न कोणी जोडीदार देवाने बनवला असतोच. उंची कमी असल्याने अद्याप लग्न न करू शकलेल्या अजिम आणि रेहानासाठी लग्न जमेल, अशी आशा आहे.