बहादुरगढ़ ( हरियाणा ) : कुंडली मानेसर पलवल एक्स्प्रेस वेवर ( KMP Expressway In Haryana ) गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. एका वेगवान ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १४ मजुरांना ( Truck Crushed 14 Laborer ) चिरडले. या अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 11 मजूर जखमी झाले. यातील काही मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या 10 मजुरांना उपचारासाठी पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे. तर 1 जखमीला उपचारासाठी बहादूरगड येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताबाबत माहिती देताना एसपी म्हणाले की, अपघातातील सर्व बळी KMP (KMP एक्सप्रेसवे) वरील पुलांच्या दुरुस्तीचे काम करत होते. सायंकाळी उशिरापर्यंत काम संपल्यानंतर मजूर रस्त्याच्या कडेला झोपले. झोपण्यापूर्वी रस्त्याच्या एका बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि रिफ्लेक्टरही लावण्यात आले होते. मात्र एका भरधाव ट्रकने सर्व बॅरिकेड्स तोडून या मजुरांना चिरडले. मजुरांना चिरडल्यानंतर वेगवान ट्रक एक्स्प्रेस वेवर उलटला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. हे सर्व मजूर उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी आहेत. ते गेल्या दोन महिन्यांपासून केएमपीवर कार्यरत होते.
ट्रकचालकाची ओळख पटली : गुरुवारी पहाटे 5.30 ते 6 च्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या मजुरांनी सांगितले की, काही अंतरावर भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. अपघातानंतर सर्वत्र आरडाओरडा झाला, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात आहेत. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बहादुरगड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. ही घटना घडवणाऱ्या ट्रकचालकाची ओळख पटली असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Tarak Mehata Babita Arrest : तारक मेहता..फेम बबीताला अटक, वाचा - पुढे काय घडले?