पणजी (गोवा) - कोविड साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गोवा सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. शुक्रवारी राज्यातील बालरोगतज्ज्ञ आणि परिचारिकांना मुलांना कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी प्रोटोकॉलवर प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून बालरोगतज्ज्ञ आणि परिचारिकांचे प्रशिक्षण हे सुरू होणार आहे. अशी माहिती येथे टास्क फोर्स बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली.
१२० बालरोगतज्ज्ञ आणि परिचारिकांना प्रशिक्षण देणार -
गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात १२० बालरोगतज्ज्ञ आणि इतर परिचारिकांना प्रशिक्षण देणार असल्याचे ते म्हणाले. सावंत म्हणाले की, कोरोना साथीच्या आजाराची संभाव्य तिसरी लाट थांबविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. बालरोग अतिदक्षता विभाग उभारण्यासाठी आवश्यक उपकरणे १० जूनपर्यंत राज्यात दाखल होतील.
जीएमसीएच आणि दोन उपजिल्हा रुग्णालयात मुलांसाठी सुविधा -
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुपर स्पेशॅलिटी ब्लॉक हे मुख्य केंद्र आहे. जेथे मुलांच्या उपचारासाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तर म्हापसा शहरातील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि मडगाव शहरातील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय अशी दोन अन्य जिल्हा रुग्णालये ही आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवली गेली आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरण प्रक्रियेतील प्राधान्याने राज्य सरकारने दहा वर्षापर्यंतच्या मुलांच्या पालकांचे वर्गीकरण केले आहे. सर्व ८२ लसीकरण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असल्याने सर्व पालकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील संरक्षक भिंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोसळली