उन्नाव - जिल्ह्यातील असोहा पोलीस ठाणे क्षेत्रात बुधवारी तीन मुली संशयास्पद अवस्थेत आढळल्या होत्या. यातील दोन मुलींचा बुधवारी रात्रीच मृत्यू झाला तर एकीवर कानपूर शहरातील रिजेंसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलींवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेशात महिला सुरक्षेचा मुद्दा पुढे आला असून खळबळ उडाली आहे. गावामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि मोठा फोजफाटा मुलींच्या गावी ठेवण्यात आला आहे. पीडित कुटुंबीयांच्या घरालाही सुरक्षा पुरवण्यात आली आली. नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून गोंधळा घातला आहे.
काय आहे प्रकरण?
बुधवारी (१७ फेब्रुवारी) असोहा येथील एका गावातील तीन मुली गवत आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतरही त्या माघारी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरूवात केली. कुटुबीयांना तिन्ही मुली शेतात बांधलेल्या अवस्थेत मिळाल्या. तसेच त्यांच्या तोंडातून फेस येत होता. कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांना तिन्ही मुलींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यातील दोन मुलींना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. पुढील उपचारासाठी तिला कानपूरला हलवण्यात आले आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल लवकरच येणार -
दोन्ही मृत मुलींचे शवविच्छेद करण्यात आले असून अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, रुग्णालयाबाहेरही गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून तेथेही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या विभागीय पोलीस महानिरिक्षकांनी शवविच्छेदनगृहावर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक पाठवले आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यू मागचे कारण स्पष्ट होणार आहे. विविध नमुनेही वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तिघींवही विषप्रयोग झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत ठोस काहीही समोर आले नाही.