चेन्नई : तामिळनाडूमधील एआयएडीएमके सरकारने तब्बल १२,११० कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे. एकूण १६.४३ लाख शेतकऱ्यांची कृषी कर्जे या अंतर्गत माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केली आहे.
तात्काळ होणार लागू, राज्य सरकार देणार निधी..
पलानीस्वामी यावेळी म्हणाले, की ही कर्जमाफी तात्काळ लागू करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार पुरवणार आहे. एआयएडीएमके हा लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करणारा पक्ष असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
डीएमकेवर टीका..
यावेळी बोलताना पलानीस्वामी यांनी विरोधी पक्ष डीएमकेवर टीका केली. ते म्हणाले, की डीएमकेने दोन एकर जमीन देण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला केले होते. मात्र, त्यांनी ते आश्वासन पूर्ण नाही केले. आमच्या पक्षाने मात्र कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काही महिन्यांमध्येच तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पलानीस्वामी यांची ही घोषणा नक्कीच महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
हेही वाचा : ट्रॅक्टर रॅली हिंसाचार : आरोपींची छायाचित्रे दिल्ली पोलिसांकडून प्रसिद्ध